नागपूर : माजी नगरसेवक नितीश ग्वालबंसी यांनी आज (दि. २७) काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. तर, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजपप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ते २०१६ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधून काँग्रेसकडून निवडून आले होते. त्याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारीपदही त्यांच्याकडे होतं. आज त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्वालबंसी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गडकरी व फडणवीस यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात माजी आ. सुधाकर देशमुख, आ. प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्वालबंसी यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनाम्याची प्रत त्यांच्या फेसबूक अकाउंटला शेअर करत माहिती दिली.