नागपूर : नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नावावर मंगळवारी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी आ. ठाकरे यांचे उमेदवार म्हणून नाव सूचविले तर नितीन राऊत यांनी अनुमोदन दिले. बैठकीत एकताने झालेला निर्णय प्रदेश काँग्रेस व अ.भा. काँग्रेस समितीला कळविण्यात आला. त्यामुळे अ.भा. काँग्रेसकडून आ. ठाकरे यांची अधिकृत घोषणा झाली तर नागपुरात भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध आ. विकास ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीबाबत रविवार व सोमवार असे दोन दिवस मुंबईत नेत्यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र चालले. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महासचिव मुकुल वासनिक यांनी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री नागपुरातील नेत्यांशी चर्चा केली. पक्षाच्या सर्वेक्षणाचा आधार देत आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांनी लढावे, हायकमांडचा आग्रह होता. मात्र, ठाकरे व वंजारी दोघेही इच्छुक नव्हते. मंगळवारी सकाळी शहरातील काही पदाधिकारी आ. विकास ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहचले. या पदाधिकाऱ्यांनी शहरात पक्ष जीवंत ठेवायचा असेल तर आ. ठाकरे यांनी लढावे, अशी भावना व्यक्त केली. यानंतर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या शंकरनगरातील घरी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. तीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, आ. अभिजित वंजारी, व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा, सोशल मिडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड, राजेंद्र तिडके आदी उपस्थित होते. बैठकीत आ. अभिजित वंजारी, नितीन राऊत यांच्या नावावरही चर्चा झाली. शेवटी मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत यांनी आ. विकास ठाकरे यांनीच लढावे, असा आग्रह धरला व एकमताने निर्णय घेतला.
काँग्रेसचा सैनिक बनून लढेल
काँग्रेस पक्ष एका कठीण काळातून जात आहे. नागपूर शहराचा अध्यक्ष म्हणून या पक्षाचे अस्तीत्व कायम ठेवण्याचे प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत एकमताने माझ्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांची मागणी व नेत्यांच्या निर्णयाचा आधार म्हणून आपण निवडणूक लढविण्यास होकार दिला आहे. हायकमांडने उमेदवारी जाहीर केली तर पक्षाचा सैनिक बनून निवडणूक लढेल. - आ. विकास ठाकरे