लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जि.प. निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली असताना काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख चक्क भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून आले. यावरून पक्षाच्या गोटात खळबळ माजली असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी समोर येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.
सावरगाव सर्कलमधून पार्वताबाई काळबांडे या भाजपच्या उमेदवार असून त्यांच्या निवासस्थानी २५ सप्टेंबर रोजी बैठक व छोटेखानी सभा झाली. या बैठकीत प्रचाराचे नियोजन झाले व या वेळी तेथे आशिष देशमुख उपस्थित होते. त्यांच्यासह भाजपचे उकेश चव्हाण व इतर पदाधिकारीदेखील होते. भाजप उमेदवाराच्या प्रचाराला देशमुख गेल्याने तेथील कार्यकर्त्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. काही दिवसांअगोदर देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना क्रीडामंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. यानंतर केदार यांनी काँग्रेसच्या आढावा बैठकीत देशमुख यांचे नाव न घेता आक्रमक भूमिका घेतली. पक्षाचा कितीही मोठा नेता काँग्रेससोबत बेईमानी करीत असेल तर तेथेच गाडीतून ओढा व दोन लावा, असे वक्तव्य त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख भाजप उमेदवाराच्या प्रचाराला गेल्याने वातावरण आणखी तापले आहे. याची छायाचित्रेदेखील व्हायरल होत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
निलंबनासाठी कोणत्या पुराव्याची वाट बघता
काँग्रेसचे विभागीय बूथ समन्वयक प्रकाश वसू यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिस्तभंग समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र लिहून देशमुख यांची तक्रार केली आहे. आशिष देशमुख पक्षविरोधी पावले उचलत असून कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी आणखी कोणत्या पुराव्याची वाट बघता, असा सवाल करत त्यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली.