आवारी, धवड, गुडधेंसह ५५ जणांचे शिष्टमंडळ राजधानीने रवाना : राहुल गांधी, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण यांच्यासह नेत्यांना भेटणारनागपूर : महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतररही नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत. आता नागपुरातील काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी पोहचला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व नगरसेवकांचा समावेश असलेले सुमारे ५५ जणांचे शिष्टमंडळ रविवारी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. संबंधित शिष्टमंडळ अ.भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेणार असून पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलण्याची मागणी करणार आहेत. माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासह सुमारे ११ ते १२ नगरसेवक व सुमारे ४४ ते ४५ पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रविवारी रात्री राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीसाठी रवाना झाले. ११ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिली आहे, अशी माहिती दिल्ली मोहिमेत सहभागी असलेल्या एका काँग्रेस नेत्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले. यानंतर विरोधी पक्षनेता निवडीसाठी पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी- नितीन राऊत यांच्या गटाकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर करण्यात आले होते तर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या गटाकडून संजय महाकाळकर यांचे नाव समोर करण्यात आले होते. शेवटी महाकाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधील गटबाजी आणखीनच वाढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाकाळकर यांच्यासोबत बहुमत नसतानाही त्यांना विरोधी पक्षनेता बनविण्यात आले, अशी तक्रार दिल्लीत केली जाणार असून त्यांना बदलण्याची मागणीही केली जाणार आहे. या नगरसेवकांनी गाठली दिल्ली दिल्ली गाठणाऱ्या नगरसेवकांमध्ये प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे, कमलेश चौधरी, मनोज गावंडे, झुल्फिकार भुट्टो, सय्यदा निजाम, निशान केबलवाले, आशा उईके (नेहरू), प्रणिता शहाणे यांचा समावेश आहे. नगरसेविका हर्षला साबळे यांचे पती माजी नगरसेवक मनोज साबळे, नगरसेवक बंटी शेळके यांचे वडील बाबा शेळके हे देखील दिल्ली मोहिमेत सहभागी झाले आहेत. नगरसेवक संदीप सहारे, पुरुषोत्तम हजारे या मोहिमेत सहभागी झाले नाही.
काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी
By admin | Published: April 10, 2017 2:28 AM