कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही; रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य
By कमलेश वानखेडे | Published: April 5, 2024 04:53 PM2024-04-05T16:53:31+5:302024-04-05T16:54:27+5:30
जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य.
कमलेश वानखेडे, नागपूर : निवडणुकीत कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनता आम्हाला मदत करेल व जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथे प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी रमेश चेन्नीथला शुक्रवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. .यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडी यात्रेत लोकांना वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी, सर्वांना न्याय देण्यासाठी देशात इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करत असताना जागा एकमेकांना शेअर कराव्या लागतात. आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. सांगलीचा विषय आज किंवा उद्या सुटलेला असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
वंचितशी शेवटपर्यंत चर्चेची तयारी : मुकुल वासनिक
अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत शेपर्यंत चर्चेची तयारी असल्याचे सांगितले. चेन्नीथला यांच्यासोबत चंद्रपूर येथे प्रचार सभेसाठी रवाना होत असताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अनेक दिवसापासून जागा वाटपाची चर्चा सूरू आहे. वंचित सोबत अनेक बैठक झाल्या. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.