लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेसोबत जिल्ह्यातील १३ पंचायत समितीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात एकूण ११६ जागांपैकी सर्वाधिक ५९ जागा मिळवित पहिली पसंती काँग्रेसला मिळाली. सोबतच १३ पैकी ८ पंचायत समितीवर बहुमताचा जादूई आकडा पार केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन तर भाजपकडे एक पंचायत समिती आली. कामठी पंचायत समितीवर काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आल्याने ‘फिफ्टी - फिफ्टी’चा मामला झाला आहे. ती पंचायत समिती कोण ताब्यात घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.काँग्रेसने शतप्रतिशत जागा मिळविलेल्या पंचायत समितीमध्ये कळमेश्वर (सहापैकी सहा), सावनेर (१२ पैकी १२), उमरेड (८ पैकी ८) या तीन पंचायत समित्यांचा समावेश आहे. सोबतच पारशिवनीत ८ पैकी ६, नागपूर ग्रामीणमध्ये १२ पैकी ६, भिवापूरमध्ये ४ पैकी ३ आणि मौदा व रामटेकमध्ये प्रत्येकी १० पैकी ५ जागा मिळवित बहुमत प्राप्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसने गृहक्षेत्र असलेल्या नरखेड, काटोल आणि हिंगणा पंचायत समितीवर बहुमत मिळविले. नरखेडमध्ये ८ पैकी ८, काटोलमध्ये ८ पैकी ५ आणि हिंगण्यात १४ पैकी ८ जागा मिळवित एकहाती सत्ता प्राप्त केली.भाजपला केवळ कुही पंचायत समिती कब्जा करण्यात यश आले. एकूण ८ पैकी ५ जागा भाजपने तेथे मिळवित बहुमत प्राप्त केले. तर कामठीत एकूण ८ पैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या. त्यामुळे जोपर्यंत सभापती निवडून येत नाही, तोपर्यंत सत्तापेच कायम राहील. तर शिवसेनेला मात्र कोणत्याही पंचायत समितीवर बहुमत मिळविता आले नाही. एवढेच काय तर १३ पंचायत समितीतील ११६ जागांपैकी अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले.
नागपूर जिल्ह्यात पंचायत समितीत्यांवर काँग्रेसचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:02 AM
जिल्हा परिषदेसोबत जिल्ह्यातील १३ पंचायत समितीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात एकूण ११६ जागांपैकी सर्वाधिक ५९ जागा मिळवित पहिली पसंती काँग्रेसला मिळाली.
ठळक मुद्देआठवर बहुमत : राष्ट्रवादीकडे तीन तर भाजपकडे फक्त एक