- मोरेश्वर मानापुरे नागपूर - लोकसभेच्या काही जागा थोड्याशा फरकाने जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उन्माद आला आहे. त्याचा प्रत्यय देशातील जनतेला नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून, खा. बळवंत वानखेडे यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडून आणि खा. प्रतिभा धानोरकर यांनी शिव्यांची लाखोटी वाहून आला आहे. काँग्रेसचा हा उन्माद विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळवून नक्कीच उतरवू, असा विश्वास खा. अनिल बोंडे यांनी येथे व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या नागपूर कार्यालयात रविवारी नागपूर ग्रामीणमधील १५० कार्यकर्त्यांना बैठकीत खा. अनिल बोंडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते. खा. अनिल बोंडे म्हणाले, राखीव मतदारसंघातून निवडून आलेले बळवंत वानखेडे यांना यशोमती ठाकूर यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडताना हाताने फिरविले आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. ही खोली रा.सु. गवई यांच्या निधीतून उभारण्यात आली आहे. खा. आनंदराव अडसूळ यांचे कार्यालय होते. सन २०२२ रोजी मी राज्यसभेवर गेल्यानंतर या खोलीत माझे आणि खा. नवनीत राणा यांचे कार्यकर्ते बसायचे. त्यानंतर त्या खोलीला कुलूप लावण्यात आले. पण बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट न पाहता थेट सरकारी मालमत्तेचे कुलूपच तोडले. काँग्रेसचा हा उन्माद आता सहन करणार नाही, असा इशारा खा. बोंडे यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५० नवीन मतदार वाढविणार आहे. २३ जून ते ६ जुलैपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान पंधरवडा आणि यादरम्यान अनेक उपक्रम व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कापूस व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ हजार कोटींची मदत दिली. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करणार असल्याचे खा. बोंडे म्हणाले.
विधानसभेच्या सहाही जागा जिंकू - सुधाकर कोहळेसुधाकर कोहळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जागतिक संघटनांनी एकत्रित येऊन सोशल मीडियातून संविधान धोक्यात असल्याचे सांगून जनतेत संभ्रम पसरविला. रामटेक लोकसभा मतदारसंघात बहुतांश क्षेत्रात भाजपा पुढे आहे. आता नागपूर ग्रामीण मतदार संघाच्या सहाही जागा मोठ्या फरकाने जिंकू. कोहळे म्हणाले, वेळेवर उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही. परंतु पंतप्रधान मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या. संभ्रम दूर केला. शिवसेनेच्या उमेदवाराला ५.३३ लाख मते मिळाली. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे म्हणून १५०० मतदार असलेल्या बूथचे विभाजन, प्रत्येक बूथवर ५० नवीन मतदार करू आणि चूका सुधारू. आता विधानसभानिहाय जाऊन जनजागृती करणार आहे. भाजपा जिंकल्यानंतर उन्माद करीत नाही आणि हरल्यानंतर निराश होत नाही, असे कोहळे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत माजी आ. मल्ल्किार्जुन रेड्डी, अशोक धोटे, राजू पोतदार, अरविंद गजभिये, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, उदयसिंग यादव, संध्या गोतमारे आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.