सुराबर्डीत आज विचारमंथन : नगरसेवकांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती नागपूर : स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून दबाव वाढल्यानंतर आता नागपुरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येत महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. आज, सोमवारी सुराबर्डी यथील मिडास फार्म येथे काँग्रेसचे स्थानिक नेते व ४१ नगरसेवकांची बैठक होत असून तीत निवडणुकीची तयारी व आव्हाने या विषयावर विचारमंथन होणार आहे. दुपारी १२ ते ४ अशी चार तास चालणाऱ्या या या बैठकीला काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहतील. बैठकीसाठी सर्व नगरसेवकांना लेखी सूचना देण्यात आल्या असून बैठकीला येताना सहा मुद्यांवर तयारी करून येण्याचेही सांगण्यात आले आहे. या बैठकीत नगरसेवकांची मते जाणून घेतली जातील. आगामी निवडणूक लढायची आहे का, त्यासाठी तयारी कशी सुरू आहे, चार सदस्यीय प्रभागात आव्हाने कोणती आहेत, विजयाची संधी किती आहे, कोणत्या प्रश्नावर, मुद्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, काँग्रेसची मते वाढविण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत व काय करण्याची आवश्यकता आहे, नेत्यांकडून व पक्षाकडून काय मदत अपेक्षित आहे, आदी बाबींचा आढावा नगरसेवकांकडून घेतला जाईल. (प्रतिनिधी) साडेचार वर्षात काय केले ? महापालिकेत काँग्रेसची सत्ता नाही. दोन वर्षांपासून राज्यातही सत्ता नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस नगरसेवकांना प्रभागात विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही, हे उघड आहे. मात्र, या पलिकडे जाऊन नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात कोणती आंदोलने केली, जनतेचे कोणते प्रश्न हाताळले, प्रभागात काँग्रेस वाढीसाठी काय प्रयत्न केले, याचा आढावा नगरसेकांना या बैठकीत सादर करावा लागणार आहे. पुढील आठवड्यात पराभूत उमेदवारांची बैठक काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाल्यानंतर पुढील आठवड्यात पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत काही मतांनी पराभूत झाल्यानंतर मतांची दरी भरून काढण्यासाठी संबंधितांनी काय उपाय योजले, ते पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत का याचा आढावा घेतला जाईल. या बैठकीनंतर उमेदवार चाचपणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
काँग्रेस उतरली मैदानात
By admin | Published: August 01, 2016 2:00 AM