Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:34 AM2019-10-02T00:34:21+5:302019-10-02T00:35:14+5:30

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पश्चिम नागपूरसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह गिरीश पांडव (दक्षिण नागपूर) व राजू पारवे (उमरेड) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

Congress 'hand' to Thakre, Pandav and Parwe: Three chances in second list | Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी

Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व, मध्य नागपूर, कामठी, रामटेक पेंडिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पश्चिम नागपूरसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह गिरीश पांडव (दक्षिण नागपूर) व राजू पारवे (उमरेड) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. तर, मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात नेमके कुणाला लढवावे, यावर संभ्रम कायम आहे. पूर्व नागपूर, मध्य नागपूर तसेच कामठी व रामटेक या जागांवर उमेदवार निश्चित करण्यात पक्षश्रेष्ठींचाही कस लागत आहे. त्यामुळे हे मतदारसंघ ‘पेंडिंग’ ठेवण्यात आले आहेत.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना पुन्हा पश्चिम नागपुरातून संधी देण्यात आली आहे. गेल्यावेळी ठाकरे यांचा पश्चिममध्ये पराभव झाल्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये, यासाठी काहिंनी पक्षांतर्गत फिल्डिंग लावली होती तर ठाकरे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्याही सातत्याने उडत होत्या. मात्र, गेली पाच वर्षे त्यांनी पक्षासाठी केलेली आंदोलने व राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत श्रेष्ठींनी त्यांनाच ‘हात’ दिला. दक्षिण नागपुरात गिरीश पांडव यांच्या रूपात नवा युवा चेहरा देण्यात आला आहे. दक्षिणसाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव विशाल मुत्तेमवार व निर्मल उज्ज्वल बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे हे देखील स्पर्धेत होते. शेवटी तिकिटाच्या महाभारतात ‘पांडव’ यांनी रण जिंकले. उमरेडमध्ये काँग्रेसने राजू पारवे यांच्या रूपात नवा चेहरा दिला. गेल्या निवडणुकीत पारवे यांनी अपक्ष म्हणून लढा देत काँग्रेस उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली होती. त्यांच्या ताकदीची काँग्रेसने यावेळी दखल घेतली.
मध्य नागपूरच्या तिकिटासाठी युवक काँग्रेसचे बंटी शेळके, नगरसेवक रमेश पुणेकर, अ‍ॅड. आसिफ कुरेशी, डॉ. राजू देवघरे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली. पूर्व नागपूरची जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेवक दुनेश्वर पेठे यांचे नाव आहे तर काँग्रेसकडून प्रदेश सचिव अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री यांच्यासह नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्या नावावर मंथन सुरू आहे. रामटेकची जागा भाजप लढणार असल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल काय भूमिका घेतात, याकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक व चंद्रपाल चौकसे या दोन नावांवर विचार सुरू आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा झाली नाही. ते काटोल मतदारसंघातूनही लढू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसनेही कामठीबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. सद्यस्थितीत कामठीत माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर व जि.प. सदस्य नाना कंभाले यांची नावे आघाडीवर आहेत.
अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हाती विदर्भाच्या निवड समितीची सूत्रे आहेत. वासनिक प्रत्येक जागेबाबत विचारपूर्वक निर्णय घेतील, अशी पक्षात चर्चा होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वासनिक यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी मंत्री नितीन राऊत व आ. सुनील केदार यांची नावे पहिल्याच यादीत जाहीर झाली. त्याचवेळी वासनिक हे व्यक्तिगत मतभेद न पाहता पक्षहित विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतील, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली होती. दुसऱ्या यादीत वासनिक कुणाला झुकते माप देतात, याकडे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबाबत संभ्रम
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नेमके कुणाला लढवायचे, याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी संभ्रमात आहेत. पक्षश्रेष्ठींनी काही दिग्गज उमेदवारांना विचारणा केली. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. जय जवान जय किसानचे संयोजक प्रशांत पवार, असोक सिंग चव्हाण, माजी नगरसेविका रेखा बाराहाते, किशोर उमाठे यांची नावे चर्चेत आहेत. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी उमेदवारी मागितलेली नाही. मात्र, ऐनवेळी त्यांनाही लढण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.

Web Title: Congress 'hand' to Thakre, Pandav and Parwe: Three chances in second list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.