लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी खासदार गेव्ह आवारी हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष असताना १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या दबावाखाली व त्यांच्याशी हातमिळवणी करून आवारी यांनी काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह गोठवले. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरोधात अपक्ष म्हणून लढले. यामुळे काँग्रेसचा पराभव झाला व भाजपाला महापालिकेत सत्ता मिळाली. शहरात काँग्रेस बुडविण्याचे पाप आवारींनीच केले. सद्यस्थितीत ते पक्षविरोधी कारवायांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या कोर कमिटीने अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.शहर काँग्रेसच्या कामकाज कोर कमिटीची गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात बैठक झाली. तीत जयंत लुटे, बंडोपंत टेंभूर्णे, राजू व्यास, संदेश सिंगलकर, प्रा. दिनेश बानाबाकोडे, रत्नाकर जयपूरकर, अॅड. अशोक यावले, प्रा. हरीश खंडाईत, प्रा. अनिल शर्मा, किशोर गीद, अतिक अहमद उपस्थित होते. आवारी यांनी बुधवारी राहुल गांधी यांना पत्र पाठवून माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. बैठकीत आवारींच्या या पत्राचा समाचार घेण्यात आला. आवारी यांनी केलेल्या पक्ष विरोधी कारवायांवर चर्चा करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव संमत करून राहुल गांधी यांच्याकडे पाठविण्यात आला.बैठकीत सदस्य म्हणाले, १९९७ मध्ये आवारी हे चतुर्वेदी यांच्या दबावात आले नसते, ताठर भूमिका घेतली असती व पक्षाच्या उमेदवारांना न्याय दिला असता तर आज पक्षावर ही वेळ आली नसती. आवारी हे अध्यक्ष असताना त्यांना पदच्युत करण्यासाठी चतुर्वेदी यांनी देवडिया काँग्रेस भवनाचे दार तोडून ताबा घेत आवारी यांना नामोहरम केले होते. त्यावेळी आवारी व चतुर्वेदी यांच्यात विस्तवही जात नव्हता, याची आठवणही करून देण्यात आली.काँग्रेस पक्षाने आवारी यांना नगरसेवक, आमदार, खासदार व परिवहन महामंडळाचे अध्यक्षपदही दिले. मात्र, गेल्या २० वर्षात आवारी हे कधीही भाजपा नेत्यांविरोधात बोलले नाही. पक्ष संघटना वाढविण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. फक्त भाषण करण्याशिवाय कोणतेही उल्लेखनीय काम त्यांनी केलेले नाही. स्वातंत्र्य सेनानी मंचरशा आवारी यांचे पुत्र असल्याचा फायदा घेत राहिले. उलट पक्षाचे कार्यक्रम फेल पाडण्यासाठी षड्यंत्र रचण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दुसरीकडे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात गेल्या तीन वर्षात अनेक आंदोलने झाली व ठाकरे यांच्यावर तब्बल २५ गुन्हे दाखल झाले आहेत. चंद्रपूर येथे प्रदेशतर्फे आयोजित सभेत उपस्थित न राहता आवारी हे विरोधक गटातर्फे आयोजित सभेत उपस्थित राहिले. याच कारणावरून प्रदेश काँग्रेसने प्रदेश प्रतिनिधी नेमताना आवारी यांना बाजूला सारले. तेव्हापासून यांना पक्षाच्या कुठल्याही बैठकीत निमंत्रित केले जात नाही. पक्षासाठी ते अदखलपात्र झाले आहेत. त्यामुळे त्यांनी नुसताच पत्रप्रपंच करून स्वत:चे हसू करू नये, अशी टीकाही बैठकीत करण्यात आली.आवारी हे पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची साथ देत असल्याचा आरोप करीत त्यांच्या कृत्याचा बैठकीत निषेध करण्यात आला. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर अ.भा. काँग्रेस समितीने व प्रदेश काँग्रेसने कठोर कारवाई करावी, अशा मागणीचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे बंडोपंत टेंभूर्णे यांनी सांगितले.
आवारी चतुर्वेदींच्या पे रोलवरआवारींना पक्षाने बरेच काही दिले. मात्र, स्वत:च्या स्वार्थापोटी ते प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्याच्या कटात सहभागी असलेले सतीश चतुर्वेदी यांच्या बचावासाठी एवढा उपदव्याप करीत आहेत. ते चतुर्वेदींच्या ‘पे रोल’वर आहेत, असा आरोप करीत प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष राहिलेल्या आवारी यांना हे कृत्य शोभनीय नाही, अशी टीकाही शहर काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली.