भाजपच्या उमेदवारास काँग्रेसचा ‘हात’भार; उमरेड बाजार समिती सभापतिपदी कडू तर कोहपरे उपसभापती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:57 PM2023-05-31T13:57:04+5:302023-05-31T14:00:59+5:30
मंगळवारी सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक पार पडली
उमरेड (नागपूर) : एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपला दोन मते अधिक मिळाली. भाजपच्या सभापतिपदाच्या उमेदवाराला काँग्रेस समर्थित दोन मतदारांनी ‘हात’भार लावला. काॅंग्रेसची दोन मते फुटल्याने आता विविध चर्चा रंगली आहे. उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतिपदाच्या निवडणुकीत हा चमत्कार मंगळवारी बघायला मिळाला. रूपचंद रामकृष्ण कडू हे दुसऱ्यांदा सभापती तर राजकुमार बापूराव कोहपरे हे उपसभापती म्हणून विजयी ठरले.
उमरेड बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ सदस्यांपैकी भाजप समर्थित गटाचे एकूण १२ सदस्य विजयी झाले होते. काॅंग्रेस समर्थित गटाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले होेते. मंगळवारी सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक पार पडली. सभापतिपदासाठी भाजप समर्थित गटाकडून रूपचंद कडू आणि काॅंग्रेस गटाकडून छोटू मोटघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कडू यांच्या पारड्यात १४ मते पडली.
उपसभापतिपदासाठी भाजप गटाकडून राजकुमार कोहपरे आणि संदीप हुलके या दोघांनी तर काॅंग्रेसकडून शिवदास कुकडकर यांनी अर्ज दाखल केले. हुलके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कोहपरे यांना १२ मते मिळाली. कुकडकर यांना ६ मते मिळाली. अध्यासी अधिकारी आर. ए. वसू यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती कार्यालयात गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पडली. सहायक अधिकारी म्हणून गजानन शेळके, सचिव प्रकाश महतकर होते.
विजयी जल्लोष
रूपचंद कडू आणि राजकुमार कोहपरे विजयी होताच भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, वाजतगाजत जल्लोष साजरा केला. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, जयकुमार वर्मा, पद्माकर कडू, दिलीप सोनटक्के, संजय मोहोड, गंगाधर फलके, सुरेश वाघमारे, बाबा समर्थ, वसंता पंधरे, दादाराव मुटकुरे, गोविंदा इटनकर, दयाराम चकोले, लक्ष्मण कांढरकर, विजय आंभोरे, रोहित पारवे, गिरीश लेंडे, सुभाष कावटे, सुजित कुरूटकर, कैलास ठाकरे, नंदकिशोर मानकर, विलास मेंढे आदींची उपस्थिती होती.
मागील सहा वर्षात केलेल्या विकासकामांची पावती मला मिळाली. पुढेही कष्टकरी, शेतकरी सर्वांसाठी चांगली कामे करावयाची आहेत. काही योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प आहे.
- रूपचंद कडू, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड