नागपूर : देशाचा कल कुणीकडे आहे, हे हरियाणाच्या निकालाने दाखवून दिले. हिंदूमध्ये फूट पाडून फायदा घेण्याचा काँग्रेसचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. फूट पाडा आणि राज्य करा, हा काँग्रेसचा फॉर्मुला मतदारांनी हाणून पाडला. काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो धावपट्टी व टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बुधवारी आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नागपूर विमानतळावर बुधवारी आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आभासी पद्धतीने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री मुरलीधर मोहोल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ना. हसन मुश्रीफ अणि नागपूरचे आमदार, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, एमएडीसीच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. काँग्रेसवर टिका करताना नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस दलितांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे, पण त्यांना दलितांनीच दूर लोटले आहे. काँग्रेस त्यांचे आरक्षण संपवू पाहात आहे. ओबीसी भाजपासोबत आहे. हरियाणात काँग्रेसचे सर्व षडयंत्र उद्धवस्त झाले आहे. कार्गाे धावपट्टीने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होईल. यामुळे कृषी क्षेत्रासोबत शेतकऱ्यांना विकास आणि त्यांना जास्त मोबदला मिळेल. प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नागपुरातील कार्गाे धावपट्टीमुळे नागपूरचा विकास वेगाने होईल. काही वर्षांतच नागपूर विमानतळावरून १०० विमानांची सेवा सुरू होईल. दरवर्षी १४ लाख प्रवासी ये-जा करतील आणि ९ लाख टन कार्गोची निर्यात होईल. नागपूर हे विदेश गुंतवणुकीचे केंद्र बनेल. डबल इंजिनमुळे नागपूरचा चेहरामोहरा बदलणार आहे.
नितीन गडकरी म्हणाले, कार्गो धावपट्टीचे प्रकरण साडेतीन वर्षांपासून कोर्टात रखडले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला. विमानतळाच्या विकासामुळे येथून ९ लाख टन कार्गो निर्यात होईल. याचा फायदा नागपूरच्या विकासाला आणि शेतकऱ्याना होईल. नागपूर विमानतळ हे आता विदर्भासाठी ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल. विमानतळाच्या प्रत्येक कामावर मी सुपरवायझरसारखे लक्ष ठेवणार आहे. मिहानमध्ये ६८ हजार लोकांना काम मिळाले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कार्गो धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीमुळे नागपूर विमानतळ जागतिक दर्जाचे बनेल. मध्यंतरी दुसऱ्या सरकारमुळे विमानतळाचे काम रखडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बांधकाम सुरू झाले. ३ लाख चौरस फूट आकाराची टर्मिनलची सुसज्ज इमारत तयार होईल. या इमारतीची तपासणी नितीन गडकरी करतील. वर्षाला १.४ कोटी प्रवासी आणि ९ लाख टन कार्गोची निर्यात होण्याची अपेक्षा आहे. यामुळे नागपूरचा विकास होईल.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी आभार मानले.