नागपूर - देशात फक्त काँग्रेसमुळेच गरिबी आली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काहीही फायदा झाला नाही, असे म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, कर्नाटक हिजाब वादावर बोलताना शाळेत जो युनिफॉर्म आहे, तोच घाला, बुरखा नको, असेही आठवले म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्तेवर आले नसते, असे म्हणत भाजपच्या विकासकामांची आणि रोजगार उपलब्ध केल्याची माहितीही आठवलेंनी दिली. देशात मुद्रा योजनेतून ३२ कोटी लोकांना कर्ज मिळाले असून या कर्जाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, यंदाच्या वर्षात ६० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे प्रावधान बजेटमध्ये आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेला पुन्हा एकदा आवाहन
शिवसेनेच्या भल्यासाठी आपण त्यांना आवाहन केले की, भाजपासोबत या आपले मित्र आहेत. विचार करायचा की नाही ही त्यांची इच्छा आहे. पण, लवकर बरे व्हा आणि आमच्यासोबत या, आवाहन आठवलेंनी शिवसेनेला केले आहे. मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे मन करुन कायदे मागे घेतले. त्यामुळे, सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मोदींना असून पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळाले, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.