नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला दगाफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:34 AM2018-07-25T11:34:32+5:302018-07-25T11:37:32+5:30

जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीनंतर एक नगर परिषद आणि एका नगर पंचायतीत निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी भाजपने सर्वाधिक जागा आपल्या झोळीत टाकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा नाव उंचावले.

Congress lashes out at Nagpur district | नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला दगाफटका

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला दगाफटका

Next
ठळक मुद्दे रणनीती फसली शिवसेनेलाही अपेक्षित यश नाही, अपक्षांची उंच उडीनगरपरिषद/ नगर पंचायत निवडणूक निकाल

गणेश खवसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीनंतर एक नगर परिषद आणि एका नगर पंचायतीत निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी भाजपने सर्वाधिक जागा आपल्या झोळीत टाकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा नाव उंचावले. दुसरीकडे काँग्रेसला पक्षांतर्गत राजकारण, दगाफटका यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा सहा महिन्यामध्ये दोन नगर पंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. तोपर्यंत किमान हा ‘खेळ’ थांबला नाही तर काँग्रेसच्या ‘हातात’ काहीच उरणार नाही.
पारशिवनी नगर पंचायतसाठी काँग्रेसने जोरदार रणनीती तयार केली होती. मात्र त्यात आपल्याला उमदेवारी मिळणार नाही, यावरून खदखद निर्माण होऊन राजीनाम्यापर्यंत मजल मारली गेली. काहींनी भाजपमध्ये प्रवेश करीत तेथून उमेदवारी मिळविली आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडूनही आले. सोबतच काँग्रेसच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी वातावरण तयार केले. त्यामुळे मतदारांपर्यंत जो निरोप पोहोचायचा होता, तो पोहोचला. त्याचे फळ आता निवडणूक निकालातून स्पष्ट दिसत आहे.
वास्तविक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. वानाडोंगरीत राष्ट्रवादी काँग्रेसला जनाधार असल्याचे दिसत असताना निवडणूक निकाल हा विरोधातच गेला. यामुळे आता ‘ईव्हीएम’वर दोषारोप केले जात आहे. वास्तविक मतदारांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमी पडला, अशीही सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुजबुज सुरू आहे. संपर्क अभियान, मतदार जोडो यासारखे अभियान या पक्षालाही राबविता आले असते. परंतु तसे काही झाले नाही. त्याचे परिणाम हे मतांतून स्पष्ट दिसले.
शिवसेना पक्ष हा थोडा कमजोरच ठरला. वानाडोंगरीमध्ये शिवसैनिकांचा जोर असताना तेथे एकही उमेदवार निवडून न येणे ही धोक्याची घंटा आहे. पारशिवनीचे नगराध्यक्षपद आणि चार जागांवर सेनेला समाधान मानून घ्यावे लागले. पारशिवनीत माजी आ. जयस्वाल यांची ताकद कमी झाली का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्यास नवल नाही.
एवढेच काय तर पारशिवनीच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपची चांगलीच पिछेहाट झाली. तिसऱ्या क्रमांकावर तेथे उमेदवार राहिला. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. अवघ्या २११ मतांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीतून काँग्रेसने खूप काही शिकण्यासारखे आहे. अन्यथा आगामी निवडणुकीतही हेच चित्र दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.
येत्या सहा महिन्यातच महादुला आणि मौदा नगर पंचायतीत निवडणूक असून त्यासाठी आतापासून तयारी करणे गरजेचे झाले आहे.
भाजपला पारशिवनी आणि वानाडोंगरी या दोन्ही ठिकाणी बहुमताचे पाठबळ मिळाले असले तरी पारशिवनी नगर पंचायत हातातून गेली, हे विशेष! त्यातून भाजप नेत्यांनी धडा घ्यावा.
बसप आणि मनसेची मुसंडी
वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत बसपने भाजपला चांगलेच पछाडले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी मार्गात अडथळे बनण्याचे काम केले. बसपने चार ठिकाणी तिसऱ्या क्रमांकापर्यंतची मजल मारली. प्रभाग क्र. १० अ मध्ये अपक्ष उमेदवार तर १०-ब मध्ये मनसे उमेदवार द्वितीय स्थानी राहिला. या दोन्ही ठिकाणी राकाँ उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागून भाजपने विजयाचा मार्ग सुकर केला. यासोबतच प्रभाग क्र. २-अ, २ -ब, प्रभाग क्र. ४-अ आणि ब, प्रभाग क्र. ५-अ मध्येही अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारली. प्रभाग क्र. ५-ब मध्ये तर अपक्ष उमदेवाराने विजय साकारला.

 

Web Title: Congress lashes out at Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.