लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीचे सेवाग्राममध्ये आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शांती व सद्भावनेसंदर्भात प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरोधात येथूनच शंखनाद होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत यांनी दिली.नवी दिल्लीहून सोमवारी सकाळच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर अशोक गहलोत यांचे आगमन झाले. येथून ते थेट सेवाग्रामकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महात्मा गांधी यांचे देशाच्या स्वातंत्र्यात व पुढील पिढ्यांना विचारांची दिशा दाखविण्यात मौलिक योगदान आहे. त्यांच्या १५० व्या जयंतीवर्षाची सुरुवात होत असताना कॉंग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते सेवाग्राममध्ये उपस्थित राहतील. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत देशातील द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही चिंतन व मनन करु. तसेच या कार्यकारी बैठकीत विविध प्रस्तावदेखील मांडण्यात येतील व त्यावर सखोल चर्चा होईल. महात्मा गांधी यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीतून कॉंग्रेस नवीन उर्जा घेऊन देशभरात नव्या जोमाने कामाला लागेल, अशी माहिती गहलोत यांनी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे १ आॅक्टोबर रोजीच सेवाग्रामला पोहोचण्याची शक्यता आहे. यावेळी कॉंग्रेसकडून येथे शांतीमार्च काढण्यात येणार आहे. त्यानंतर राहुल गांधी हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचीदेखील शक्यता आहे.