लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्ताधारी भाजपला हिंदी भाषिक भागांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांदरम्यान काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी केला आहे.अविनाश पांडे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता २०१४ च्या निवडणुकीपेक्षा खूप घसरली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ‘एअर स्ट्राईक’ कारवाईचे ज्या प्रकारे राजकारण करण्यात आले, ते नागरिकांना आवडलेले नाही. भाजपा मुख्य मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे, यात ते यशस्वी होणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालाने हिंदी भाषिक राज्यातील नागरिक काय विचार करीत आहेत, ते दिसून आले आहे. ते ज्या राजस्थानचे प्रभारी आहेत, तेथील सर्व २५ जागांवर काँग्रेसची नजर आहे. येथे काँग्रेस २० पेक्षा अधिक जागा जिंकेल. इतर पक्षांच्या मदतीने काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन करण्यास यशस्वी ठरेल, असा दावाही त्यांनी केला.उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्यचकित करणारपांडे म्हणाले, उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्यचकित करणारे असतील. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या खूप मेहनत घेत आहेत. त्यांची मेहनत निश्चितच फळास येईल. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढेल. भाजपला तिथे मोठे नुकसान होईल. व्यापारी, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आदी समाज भाजपावर नाराज आहे. निवडणुकीत याचा परिणाम निश्चित दिसून येईल.महाराष्ट्रातही युतीला मातनागपूर लोकसभा मतदारसंघातील लढत काट्याची होईल. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी भाजप-शिवसेनेला मात देईल, असा दावाही त्यांनी केला.