नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी ज्या पद्धतीने निवडणूक होणार आहे, त्याच पद्धतीने प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीही निवडणूक व्हावी अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी उघडपणे मांडली.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. मात्र, नागपुरात काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड व्हावी, अशी मागणी केली. आता नेमणुकीची पद्धत बंद करावी असे देशमुख म्हणाले. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होत असताना प्रदेशाध्यक्षाची निवड करताना ती प्रक्रिया का अवलंबली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेस पक्ष जात असताना कुठेतरी या नियुक्त्या होत असतील तर त्याला खोडा लागल्यासारखं होईल. त्यामुळे, या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. ते जर होऊ नये असे वाटत असेल तर, प्रदेशाध्यक्षही निवडून जाण्याची गरज आहे. सर्व प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीतील सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करावी, असेही देशमुख म्हणाले.