लहान राज्यांच्या निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी; आशिष देशमुखांचं पंतप्रधान मोदींना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 12:52 PM2022-07-16T12:52:27+5:302022-07-16T13:02:03+5:30
यासंबंधीची घोषणा येत्या १५ ऑगस्टला देशाला उद्देशून संभाषणात करावी, अशी विनंती माजी आ. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशात एकूण ७५ राज्यांची निर्मिती करावी. याची सुरुवात ‘विदर्भ’ या ३० व्या राज्याची निर्मिती करून करावी आणि यासंबंधीची घोषणा येत्या १५ ऑगस्टला देशाला उद्देशून संभाषणात करावी, अशी विनंती माजी आ. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या शेजारी निर्माण झालेल्या लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरू आहे. दरडोई उत्पन्न दुप्पट झाले आहे. विदर्भासारखा सुजलाम् सुफलाम् प्रदेश मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. विदर्भ राज्य निर्माण केल्याशिवाय विदर्भात आर्थिक समृद्धी येणे अशक्य आहे. मागील ७० वर्षांपासून महाराष्ट्रात राहून विदर्भावर अन्यायच होत आहे. याचा दुष्परिणाम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील सर्वच क्षेत्रातील विकासकामांवर झाला असून, अनुशेष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!
महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. हे राज्य स्वत:च्या गरजा पूर्ण करू शकत नसेल, तर एका वेगळ्या राज्याएवढी लोकसंख्या आणि त्याहून मोठे प्रश्न असलेल्या विदर्भाच्या गरजा कशा पूर्ण करू शकेल, हा मोठा प्रश्न आहे. न्या. फझल अली आयोगाने (राज्य पुनर्गठन आयोग) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यासाठी शिफारस केली होती. त्याची दखल अजूनही घेतली गेलेली नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही अनेक दशके जुनी आहे. ज्यांची मागणी नव्हती, अशी राज्ये निर्माण झाली. आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करून आपण न्याय द्यावा, अशी मागणीही देशमुख यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.