राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली; आशिष देशमुखांचा प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 01:17 PM2022-05-31T13:17:10+5:302022-05-31T13:29:09+5:30

महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणात नाराजी

Congress leader Ashish Deshmukh resigns as state general secretary amid rajyasabha election candidature ticket | राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली; आशिष देशमुखांचा प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली; आशिष देशमुखांचा प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

Next

नागपूर : राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर उमटलाय. काल काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परराज्यातील नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तर, आज काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं पक्षात मोठया प्रमाणात नाराजी आहे, बदल होत असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र, याच प्रकारचे निर्णय होत असतील तर सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या निर्णयाबाबत जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न मलाही पडू लागला आहे, असे आशिष देशमुख यावेळी म्हणाले. 

इम्रान प्रतापगढी यांच मूळ नाव इम्रान खान हे आहे, मात्र ते प्रतापगढी लावतात. ते एक कव्वाल आहेत, त्यांना उत्तर प्रदेश सोडून महाराष्ट्रात उमेदवारी दिली यामुळं काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि आमच्यासारखे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविली. यात साडेसहा लाखांपेक्षा अधिक मतांनी ते पराभूत झाले, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, आता त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं मोठया प्रमाणात नाराजी आहे, असे देशमुख म्हणाले. 

देशमुख यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला. एक पद एक व्यक्ती’ आणि एका कुटुंबात एका सदस्याला उमेदवारी ही सर्व कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. मग, पी. चिदंबरम यांचा मुलगा लोकसभेत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. ५० वर्षावरील नेत्यांना तिकीट देणार नाही असा निर्णय झाला असताना १५ दिवसात या निर्णयाला तिलांजली दिली, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. 

याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू. मात्र, वारंवार हे होत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बघावं तरी कोणाकडे, हा प्रश्न उपस्थित होतोय. या सर्व कारणांमुळे मी प्रदेश काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्ष सोडणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Web Title: Congress leader Ashish Deshmukh resigns as state general secretary amid rajyasabha election candidature ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.