Mallikarjun Kharge Vs Narendra Modi ( Marathi News ) :काँग्रेसने आज स्थापना दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात महासभेचं आयोजन केलं होतं. या महासभेतील भाषणातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. "देशात महागाई, बेरोजगारी असे लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका. देशाला वाचवण्यासाठी, संविधान आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी तुम्हाला इंडिया आघाडीला मत द्यायचं आहे," असं आवाहन खरगे यांनी आपल्या भाषणातून केलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "मणिपूरमध्ये हिंसाचारात लहान मुलं मरत आहेत, स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. मात्र तिथं नरेंद्र मोदी जात नाहीत. हेच मोदी गुजरातमध्ये मात्र डायमंड व्यापाराचं उद्घाटन करायला जात आहेत. संसद सोडून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बाहेर फिरत आहेत. भाजपच्या एका खासदाराच्या पासवर तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. मात्र या एका खासदाराला वाचवण्यासाठी मोदींनी विरोधकांच्या १४६ खासदारांचं निलंबन केलं. ही लोकशाही आहे का?" असा सवाल खरगेंनी विचारला आहे.
"नरेंद्र मोदी ही सर्वाधिक खोटं बोलणारी व्यक्ती आहे. देशात दरवर्षी ५ कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. तसंच सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येतील, असं म्हणाले होते. मात्र एकही आश्वासन पाळलं नाही," असा हल्लाबोलही मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे.
"इंडिया आघाडीला तोडण्याचा डाव"
"इंडिया आघाडीतून आम्ही सगळे पक्ष भाजपविरोधात एकत्र आलो आहेत. आमच्या एकजुटीमुळे भाजप तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्यामुळेच आता इंडिया आघाडीला फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडिया आघाडीतील विविध पक्षांना दबावाचा वापर करून वेगळं करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप आजच्या सभेतून मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर केला आहे.