श्रीमंत माने, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: काँग्रेस पक्ष राम मंदिर विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींनी देशातील दलितांच्या सामाजिक न्यायाबद्दल बोलावे. आमच्या किती लोकांना मंदिरात प्रवेश दिला जातो, सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू दिले जाते का, एकत्र पंगतीत जेवण दिले जाते का, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. आम्ही यावर अधिक बोलू इच्छित नाही. तथापि, काँग्रेसविरोधात प्रोपगंडा चालवाल तर बोलावे लागेल आणि ‘हम बोलेंगे तो बात दूर तलक जाएगी’, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर मुद्द्यावर भाजपचा समाचार घेतला.
रविवारी प्रचारसभा घेण्यासाठी नागपूरमध्ये आलेले खरगे ‘लोकमत’शी बोलत होते. सोनिया गांधी व आपल्याला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचे तोंडदेखले निमंत्रण पाठवले गेले. तो धार्मिक नव्हे तर मोदींचा राजकीय ‘इव्हेंट’ होता. आदिवासी महिलेला राष्ट्रपती पद दिल्याचा गवगवा करणाऱ्या मोदींनी द्रौपदी मुर्मू देशाच्या प्रथम नागरिक असूनही त्यांना सोहळ्यापासून दूर ठेवले. आधी भूमिपूजनावेळी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही दूर ठेवले होते. त्यावर कोणी बाेलू नये, म्हणून काँग्रेस पक्ष मंदिरविरोधी असल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. धर्म ही खासगी बाब असल्याचे आम्ही मानतो. म्हणून त्यावर अधिक चर्चा करीत नाही. परंतु, अपप्रचार थांबवला नाही तर सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर बोलावे लागेल, असे ते म्हणाले.
घोषणांचे आर्थिक परिणाम अभ्यासलेत- प्रत्येक महिलेच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपयांच्या काँग्रेसच्या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येणार नाही का, या प्रश्नावर काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, गेल्या निवडणुकीवेळी आम्ही ‘न्याय’ योजनेत गरिबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. - यावेळी नोकरी किंवा बाहेरचे काम आणि गृहिणी म्हणून संसार चालविताना त्या कष्ट करतात त्याचा मोबदला मिळावा म्हणून महिलांचा विचार केला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व इतर नेत्यांनी त्याचे आर्थिक परिणाम अभ्यासले आहेत.
तृणमूलचा नवा प्रस्तावयंदाची निवडणूक अनेक दृष्टींनी निर्णायक आहे. तथापि, आपण आधीच्या कोणत्या निवडणुकीशी तिची तुलना करणार नाही. काही राज्यांचा अपवाद वगळता इंडिया आघाडी एकसंधपणे लढत आहे. केरळ, पंजाबमध्ये अडचणी नाहीत. तृणमूल काँग्रेसनेही इंडियाच्या झेंड्याखाली प्रचार घेण्याचा, किमान समान कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्ताव दिल्याचे खरगे म्हणाले.
काॅंग्रेसशासित राज्यांत आश्वासने पूर्ण केलीजाहीरनामा तयार झाल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्याचे वाचन केले. अशा प्रकारच्या गॅरंटीच्या योजना आम्ही कर्नाटक, हिमाचल प्रदेश व तेलंगणामध्ये मतदारांपुढे ठेवल्या. आम्हाला यश मिळाले. आम्ही आश्वासनही पूर्ण केले.
अभ्यासाअंतीच आश्वासनेतीस लाख नोकऱ्यांचेही आश्वासन अभ्यासाअंतीच देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे व इतर खात्यांत, निमलष्करी दलात रिक्त असलेल्या पदांची गोळाबेरीज केल्यानंतर हा आकडा समोर आला, असे खरगे यांनी सांगितले.