नागपूर : नुकतेच काँग्रेसने राज्यातील कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यातच आता सर्व सर्व नेते कामाला लागले असताना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी आशिष देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पार्वताबाई काळबांडे यांच्या प्रचारार्थ एक बैठक घेतली. या बैठकीत संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि प्रचार कार्यपद्धती ठरवण्यात आली. या बैठकीला आशिष देशमुख उपस्थित होते. या बैठकीचे फोटो व्हायरल झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
काही दिवसांआधी आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर बँकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोपही केले होते. त्यानंतर आता देशमुख यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे आशिष देशमुख नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
विशेष म्हणजेच काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांना काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीमध्ये महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निलंबनासाठी कोणत्या पुराव्याची वाट बघता
काँग्रेसचे विभागीय बूथ समन्वयक प्रकाश वसू यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिस्तभंग समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र लिहून देशमुख यांची तक्रार केली आहे. आशिष देशमुख पक्षविरोधी पावले उचलत असून कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी आणखी कोणत्या पुराव्याची वाट बघता, असा सवाल करत त्यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या देशमुख यांच्यावर आता काय कारवाई होते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.