नगरसेवकांचे तिकीट संकटात : लोकसभा, विधानसभेचा ‘हिशेब’ चुकता कमलेश वानखेडे ल्ल नागपूर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसने सत्ता गमावली असतानाही काँग्रेस नेत्यांचे डोळे उघडलेले नाही. नागपुरातकाँग्रेसचा पाया ढासळला असताना आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत संबंधितांचे तिकीट कापण्यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत. कापाकापीत नेत्यांना यात यश आले तर काँग्रेस आणखी खाईत जाण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेली गटबाजी ही आपल्या मर्जीतील कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी असल्याचे वरवर दिसत असले तरी पडद्यामागील वास्तव दुसरेच आहे. समर्थकाला तिकीट मिळवून देण्यासोबतच लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विरोधात काम करणाऱ्यांचे तिकीट आपल्या म्हणण्यावर कापले जावे यासाठी नेत्यांनी शक्ती पणाला लावली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या विद्यमान नगरसेवकाचे तिकीट कापायचे आहे याची विधानसभा मतदारसंघनिहाय यादीच नेत्यांनी तयार करून ठेवली आहे. माझ्या मतदारसंघात कुणीच बोलू नका, अशी भूमिका जवळपास सर्वच नेत्यांनी घेतली आहे. दुसऱ्या बाजूने मजबूत नगरसेवक वा पदाधिकाऱ्याचे तिकीट कटू नये यासाठी काही नेत्यांनी संयमी भूमिका घेतली आहे. पक्षच वाढला नाही, जास्त जागा जिंकल्या नाही तर आपल्यालाही पुढे कोण विचारणार, असे संयमी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे म्हणणे आहे. मध्यच्या एका नगरसेवकाला दुहेरी विरोध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य नागपुरातील काँग्रेसच्या एका नगरसेवकावर लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत पक्षविरोधात काम केल्याचा ठपका ठेवला आहे. संबंधित नगरसेवक पॉवरफूल असून निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे संबंधितांचे तिकीट कापणे योग्य होणार नाही, अशी भूमिका शहर काँग्रेसच्या एका नेत्याने घेतली. मात्र, दोन्ही बाजूचा विरोध लक्षात घेता कुणाचे काही चालले नाही. या नगरसेवकाचे तिकीट कापल्यास त्याला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत. सहा ते आठ नगरसेवक अडचणीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहाही विधानसभा मतदारसंघासाठी नेत्यांनी तयार केलेल्या यादीत एकूण आठ ते दहा नगरसेवकांचे तिकीट कापण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, काही नगरसेवकांचे तिकीट कापणे कठीण जाणार आहे. असे असले तरी सहा ते आठ गरसेवकांवर घरी बसण्याची वेळ येईल, हे निश्चित मानले जात आहे. लाटेत वाट लागली आम्ही काय करणार? लोसकभा व विधानसभेच्या निवडणुकांचा संदर्भ वापरून आपले तिकीट कटू शकते याचा अंदाज संबंधित नगरसेवकांना आला आहे. ‘लोकमत’ने संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशभरात ‘मोदी लाट’ होती. नागपुरात नितीन गडकरींसारखा हेवीवेट नेता रिंगणात होता. तर केंद्रात भाजपची सत्ता आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी लाट होती. आम्ही काँग्रेससाठी प्रामाणिक प्रयत्न केले पण मतदारांनी साथ दिली नाही. अशात आम्ही काय करणार? पराभवाचे खापर आमच्यावर फोडून नेते तिकीट कापणार असतील तर आमच्यापेक्षा काँग्रेसचेच अधिक नुकसान होईल, अशा भावनाही संबंधितांनी व्यक्त केल्या. नगरसेवकांची संभाव्य तिकीट कपात पूर्व नागपूर : २ पश्चिम नागपूर : २ दक्षिण नागपूर : २ उत्तर नागपूर : १ दक्षिण- पश्चिम : १ मध्य नागपूर : २
काँग्रेस नेत्यांचे ‘वो काट...’
By admin | Published: February 01, 2017 2:29 AM