नेते वादातच मस्त, कार्यकर्ते चिंताग्रस्त, विजयाचे वातावरण चार दिवसांत फस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:09 AM2023-02-10T11:09:49+5:302023-02-10T11:10:41+5:30

आगामी मनपा व नगर परिषदांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याचा धोका

Congress leaders engaged in internal disputes, recriminations rife | नेते वादातच मस्त, कार्यकर्ते चिंताग्रस्त, विजयाचे वातावरण चार दिवसांत फस्त

नेते वादातच मस्त, कार्यकर्ते चिंताग्रस्त, विजयाचे वातावरण चार दिवसांत फस्त

Next

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशाचे मार्केटिंग करून काँग्रेस नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांचा मार्ग सुकर करून घेण्याची गरज होती. मात्र, काँग्रेस नेते अंतर्गत वादात गुंतले आहेत. आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. यामुळे जमिनीवर काम करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता चिंताग्रस्त झाला आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाची भाजपकडे असलेली जागा १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा खेचण्यात काँग्रेसला यश आले. अमरावती पदवीधर मतदारसंघात तर महाविकास आघाडी एकसंघ लढली व भाजपचे माजी मंत्री रणजित पाटील यांचा पराभव झाला. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. पुढील निवडणुकांमध्येही भाजपचा असेच धक्के देऊ, असा आत्मविश्वास कार्यकर्ते व्यक्त करू लागले होते. मात्र, हा उत्साह चारच दिवस टिकला. नाशिकमध्ये विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांच्यावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले समोरासमोर आले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. अख्ख्या राज्यात जल्लोष सोडून काँग्रेसचे नेते आपसात भांडताहेत, असे चित्र गेले. यामुळे जनतेने मतदानातून सुधारलेली काँग्रेसची प्रतिमा नेत्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा तळाशी नेली. ही बाब जमिनीवर राबणाऱ्या कार्यकर्त्यांना पसंत पडलेली नाही. कार्यकर्ते नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. नेत्यांनी अंतर्गत वाद चार भिंतीच्या आत मिटवावा, प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन वाद चव्हाट्यावर मांडून नेतेच काँग्रेस कमजोर करीत आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहे.

आता भांडता, मग स्वत:च्या निवडणुकीत कसे एकत्र नांदता ?

- महापालिका व नगर परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. राबणारे कार्यकर्ते ही निवडणूक जिंकून राजकीय पाय रोवण्याच्या विचारात असतात. मात्र, या निवडणुका तोंडावर असताना नेते भांडत असून, काँग्रेसचे तयार झालेले वातावरण दूषित करीत आहेत. लोकसभा व विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका असतात तेव्हा नेते भांडतात का ? तेव्हा कसे मतभेद विसरून एका मंचावर येत हातात हात घेऊन उंचावता ? मग आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा तरी विचार करा, अशी कळकळीची विनंती वजा भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Web Title: Congress leaders engaged in internal disputes, recriminations rife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.