लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेससह विविध पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी म्हणजे एक महाभेसळ आहे. कॉंग्रेस आघाडीतील पक्षांचे नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांना नेता मानायला तयार नाही. वास्तवात कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अभाव आहे, या शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली. नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता शहा यांच्या सभेने झाली. यावेळी शहा बोलत होते. पूर्व नागपुरातील कच्छी विसा मैदान येथे आयोजित या सभेला नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खा.विकास महात्मे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा.कृपाल तुमाने, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते. महाआघाडीतील नेते केवळ सत्तेसाठी एकमेकांसोबत आले आहेत. मात्र सत्तास्वार्थासाठी एकत्रित आलेले लोक देशाचे हित साधू शकत नाहीत. मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशाला सुरक्षित केले. पुलवामा हल्ल्यानंतर देशात तीव्र भावना होत्या. कॉंग्रेसच्या पंतप्रधानांसारखे मौन न साधता मोदींनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर देशात उत्साह होता. मात्र पाकिस्तान व कॉंग्रेसच्या खेम्यात दु:खाचे वातावरण होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना दहशतवाद्यांसोबत ‘इलू इलू’ करू द्या, पण आम्ही गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ. पाकविरोधात ‘इट का जवाब पत्थर’ अशीच आमची भूमिका आहे, असे अमित शहा म्हणाले. सत्तेवर आल्यानंतर आम्ही कलम ३७० हटवू ही आमची भूमिका आहे. असे झाले तर काश्मीर देशापासून वेगळा होईल, असे काश्मीरचे नेते म्हणत आहेत. काश्मीर ही ओमर अब्दुल्ला यांच्या वडिलांच्या मालकीची भूमी नाही. आम्ही सरकारमध्ये असो किंवा विरोधात, काश्मीरला देशापासून वेगळे होऊ देणार नाही, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.राहुल गांधी यांनी हिंदूची माफी मागावीसमझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात असीमानंद यांच्यासह इतर आरोपींची मुक्तता झाली. कॉंग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणाला हिंदू दहशतवाद असे नाव दिले व जगभरात हिंदू समाजाची बदनामी केली. राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या शब्दात अमित शहा यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली.गडकरींनी कॉंग्रेसहून जास्त विकास केलायावेळी अमित शहा यांनी नितीन गडकरी यांचे काम कॉंग्रेसहून जास्त चांगले असल्याचे प्रतिपादन केले. नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दर्जेदार पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. अडीच पट अधिक रस्ते त्यांनी बांधले. विकासाबाबत नितीन गडकरी समर्पित नेते आहेत. कॉंग्रेसहून जास्त विकास गडकरींनी केला. हे लहान मुलगादेखील सांगेल. नागपूर व आजूबाजूच्या क्षेत्रात त्यांनी डोळे दिपवून टाकणारा विकास केला आहे. गडकरींच्या विकासकामांमुळे नागपूरमध्ये काँग्रेसला उमेदवार नाही मिळाला व त्यांना उमेदवार आयात करण्याची वेळ आली, असा चिमटादेखील शहा यांनी काढला.शेतकरी आत्महत्या थांबविणार, रोजगार वाढविणार : गडकरी प्रचाराच्या अखेरच्या भाषणात नितीन गडकरी यांनी नागपूरसह विदर्भाच्या विकासाचे ‘ब्ल्यू प्रिंट’चा मांडले. पुढील वर्षभरात नागपुरात २५ हजार व त्यानंतरच्या चार वर्षांत ५० हजार रोजगारांची निर्मिती होईल. तसेच विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून सिंचन क्षमता वाढविण्यात येईल. विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी काम करण्यात येईल. नागपुरात ‘ऑटोमोबाईल क्लस्टर’ तयार करण्यात येईल व विदर्भातील महत्त्वाची शहरे विकासाची केंद्र बनतील. नागपूर व विदर्भाला ‘ग्रोथ इंजिन’ बनवू, असा संकल्प गडकरी यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसने अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक समाजाचा केवळ उपयोग केला व काम झाल्यावर त्यांना बाजूला सारले. कथनी आणि करणी यात अंतर असते. कॉंग्रेसने दिलेल्या आर्थिक नीतीमुळे देश व जनता विकासापासून दूर राहिली. प्रत्यक्षात रोजगार देणाऱ्या आर्थिक धोरणाची आवश्यकता आहे. आम्ही त्या दिशेनेच कार्य करत आहोत. आम्ही गरीबांच्या नेमक्या समस्या जाणल्या व त्यानंतर विविध योजना लागू गेल्या, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
भाजपा-सेना जातीयवादी नाहीत : आठवलेमी अ़नेक वर्षे कॉंग्रेससोबत होतो. मात्र त्यांनी मला फसवलं. विरोधी पक्षांनी भाजपा व शिवसेनेची चुकीची प्रतिमा जनतेसमोर उभी केली आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष जातीयवादी नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असो किंवा दीक्षाभूमीचा विकास, भाजपा सरकारने तत्परता दाखविली आहे. विरोधी पक्षातील नेते खोटे आरोप करुन भाजप-सेनेला बदनाम करत असल्याचा दावा आठवले यांनी केला.