मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला राज्यातील राजकीय व सामाजिक स्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:25 AM2023-11-24T11:25:03+5:302023-11-24T11:25:46+5:30
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत विमानतळावर बंदद्वार चर्चा
नागपूर : निवडणूक प्रचारात व्यस्त असतानाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नागपुरात काँग्रेस नेते अविनाश पांडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विमानतळावर राज्यातील प्रमुख नेत्यांशी बंदद्वार चर्चा केली. या चर्चेदरम्यान खरगे यांनी राज्यातील राजकीय व सामाजिक स्थितीचा आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी खरगे यांचे स्वागत केले. यानंतर खरगे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्याशी विमानतळावरील व्हीआयपी कक्षात बंदद्वार चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत खरगे यांनी राज्यातील मराठा-ओबीसी आंदोलनाच्या सर्व बाजू जाणून घेतल्या.
राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणावरून वादळ उठले आहे. मनोज जरांगे-पाटील हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. इकडे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी नेते जरांगे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या दोन्ही आंदोलनाचा राज्यातील सामाजिक व राजकीय स्थितीवर काय परिणाम होत आहे, या मुद्यावर राज्य सरकारची काय भूमिका आहे, आदी मुद्यांवर त्यांनी उपस्थित नेत्यांकडून माहिती घेतली.
सहा महिन्यांनी लोकसभेच्या व वर्षभरावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसची स्थिती कशी आहे, महायुती सरकारचा एकूणच परफॉर्मन्स लोकांच्या नजरेत कसा आहे, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तोंडावर असून, यात सरकारला घेरण्याची काय तयारी आहे, आदी मुद्यांवरही खरगे यांनी काँग्रेस नेत्यांकडून आढावा घेतल्याची माहिती आहे.
काँग्रेसची सत्ता आल्यास जातीनिहाय गणना करू
- भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. म्हणूनच भारत जोडो करीत आहोत. ओबीसींची जातीय गणना हीच राहुल गांधी यांची भूमिका आहे.
- केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय गणना करू, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नोटीसबाबत विचारणा केली असता आम्ही सामोरे जाऊ व नोटीस आल्यानंतर ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.