कॉंग्रेस आमदार राजू पारवेंची उपमुख्यमंत्र्यांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण
By योगेश पांडे | Published: March 15, 2024 06:09 PM2024-03-15T18:09:20+5:302024-03-15T18:09:58+5:30
गुरुवारी रात्रीच्या सुमारास पारवे यांनी फडणवीस यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली
नागपूर : कॉंग्रेस आमदार राजू पारवे यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रामटेक लोकसभेच्या जागेबाबत महायुतीची नेमकी भूमिका अद्यापही निश्चित झालेली नाही. त्याचप्रमाणे पारवे पक्षबदल करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या पार्श्वभूमीवर पारवे यांच्या भेटीवरून विविध कयास लावण्यात येत आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र पारवे यांची भेट डीपीसी फंडाबाबत असल्याचा दावा केला.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास पारवे यांनी फडणवीस यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ते दुसऱ्या प्रवेशद्वाराने बाहेर निघून गेले. पारवे यांच्या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. रामटेक मतदारसंघाबाबत अद्यापही महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. शिवसेना शिंदे गटाने त्या जागेवर दावा केला आहे. तर भाजपला ती जागा हवी आहे. नवीन चेहरा म्हणून पारवे यांना पक्षप्रवेश करत तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु याबाबत कुठल्याही भाजप नेत्याने स्पष्टोक्ती केलेली नाही. दरम्यान, बावनकुळे यांनी मात्र राजकीय चर्चा नव्हे तर डीपीसीसाठी उपमुख्यमंत्र्यांना पारवे भेटल्याचे सांगितले. पारवे यांनी मलाही फोन केला होता. त्यांच्या मतदारसंघातील निधीसाठी त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे मुद्दे मांडले, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी दोन ते तीन दिवसांनंतरच रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीकडून चित्र स्पष्ट होईल.