नागपूर : काँग्रेसच्या राजस्थान येथे झालेल्या अधिवेशनात पदाची पाच वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना बदलण्याचा ठराव संमत झाला होता. त्याची अंमलबजावणी करत आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाचा तर, नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांना अध्यक्षपदी आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर, राजेंद्र मुळक यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून परराज्यातील नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून पक्षात धूसफूस सुरू आहे. तसेच, एक पद एक व्यक्ती या ठरावाचे काय झाले म्हणत काही नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याच कारणावरून काँग्रेस नेते आशिष देखमुख यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. तर, आता काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे व नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीही राजीनामा दिला आहे. मात्र, हे राजीनामे त्यांनी एकाच पदावर पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे दिले आहेत. शिर्डीच्या नव संकल्प शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपले राजीनामे सोपविल्याची माहिती आहे.
दोघांकडेही एकच पद आहे. आमदार हे पक्षाचे पद नाही. जयपूरच्या अधिवेशनात पदाची पाच वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना बदलण्याचा ठराव पारित झाला होता. काल शिर्डीच्या नव संकल्प शिबिरात प्रदेशाध्यक्ष यांनी तोच ठराव मांडला. त्यानुसार ठाकरे व मुळक यांनी राजीनामा दिला असल्याचे कळते. तर आता, आमदार अभिजित वंजारी नगरसेवक प्रफुल गुडधे व दक्षिण नागपुरातील गिरीश पांडव यांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.