बाळू धानोरकर अनंतात विलीन, वरोरा येथे अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:54 PM2023-05-31T12:54:44+5:302023-05-31T13:05:18+5:30
अखेरच्या निरोपासाठी हजारो कार्यकर्ते जमले : धानोरकर कुटुंबीयांचं पटोलेंकडून सांत्वन
चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज (दि. ३१) वरोरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेससह इतर पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. धानोरकर यांचे मंगळवारी (दि. ३० मे) पहाटे ३:३० वाजता दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
अत्यंत जड अंत:करणाने कार्यकर्ते व जनतेने त्यांना अखेरचा निरोप दिला. काल (दि. ३०) दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा शोक अनावर झाला. रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी येणाऱ्यांची रिघ लागली होती. लोकसेवेचे राजकारण करत असताना त्यांनी तरुणाईला आपलेसे केल्याने अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.
धानोरकर यांना किडनी विकारावरील उपचारासाठी बुधवारी (दि. २४) नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले होते. त्याचदरम्यान वडील नारायण धानोरकर यांच्यावरही नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, शनिवारी (दि. २७) त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाही. त्यानंतर रविवारी (दि. २८) अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, मानस आणि पार्थ ही दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.
यांची उपस्थिती -
धानोरकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.