नागपूर, दि. 16 - हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती तर मतदारसंघांतर्गत येणाºया महामार्गाच्या कामासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह भेटण्यास आलो होतो, असे सातव यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार सातव शनिवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमाराला गडकरींच्या नागपूर निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर अवघ्या काही वेळेत गडकरीदेखील घरी पोहचले. या दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली.
याबाबत ‘लोकमत’ने राजीव सातव यांना विचारणा केली असता ही भेट राजकीय मुद्दे नव्हे तर मतदारसंघासंदर्भात असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातून जाणाºया अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तसेच भूमी अधिग्रहणाच्या मुद्यावर ही भेट होती. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बायपासचा ‘सर्व्हे’ याअगोदर नागपूर ते तुळजापूर या महामार्गासाठी झाला. तेथील शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली असून, आता सुरू असलेल्या समृद्धी महामागार्साठी पुन्हा दुसºया बाजूने बायपास करण्यासाठी शेती संपादन करीत असल्याने संबधित शेतकºयांनी विरोध केल्यामुळे दोन्ही बायपास एकत्र करावे, अशी विनंती करण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळावी, अशी मागणीदेखील केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सातव यांच्यासमवेत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. या संभाजीराव देशमुख, दिलीप देसाई, राजेश्वर पतंगे, सतीश कदम, चंद्रशेखर गावंडे, पंजाबराव हाके, ग्यानोबा हाके, भाऊसाहेब साले, भारत साले, माधवराव हाके, शिवाजी गावंडे इत्यादी उपस्थित होते.