नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज लाईनवर काँग्रेसनगर मेट्रो स्टेशनचे काम प्रगतिपथावर असून, या स्टेशनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. अजनी रेल्वे स्थानकावर पोहोचणारे प्रवासी आता थेट काँग्रेसनगर मेट्रो स्टेशनवर प्रवेश करून मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत.
महामेट्रोने अजनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ ला मेट्रो स्टेशनशी जोडले आहे. त्यासाठी एस्केलेटर लावण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक सहज मेट्रो स्टेशनवर पोहोचून मेट्रो रेल्वेने प्रवास करू शकणार आहेत. ८१०० वर्गमीटर क्षेत्रात तयार होत असलेल्या काँग्रेसनगर मेट्रो स्टेशनच्या दोन्ही बाजूंनी प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था आहे. ग्राऊंड लेव्हल, कॉन्कोर्स लेव्हल आणि प्लॅटफार्म अशी ही तीन माळ्यांची इमारत आहे. दुसऱ्या माळ्यावर कॉन्कोर्स लेव्हलवर तिकीट काऊंटर व कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. येथे तळमाळ्यावर अग्निशमन टँक आणि आपात्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी स्टेशनवर पोहोचण्यासाठी शिडी, एस्केलेटरची सुविधा उपलब्ध आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा आहे. विद्युत पुरवठा करण्यासाठी यूपीएससह डीजी, उद्घोषणेची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे.
............