“केंद्र सरकारच्या दबावाखाली काम, निवडणूक आयोगाने आतातरी सुधारावे”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:46 PM2023-12-14T15:46:41+5:302023-12-14T15:48:32+5:30

Winter Session Maharashtra 2023: शासकीय कार्यालये ओस पडली आहेत, प्रशासन कोलमडले आहे, जनतेची कामे होत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे.

congress nana patole criticised central govt and election commission in winter session maharashtra 2023 | “केंद्र सरकारच्या दबावाखाली काम, निवडणूक आयोगाने आतातरी सुधारावे”; काँग्रेसची टीका

“केंद्र सरकारच्या दबावाखाली काम, निवडणूक आयोगाने आतातरी सुधारावे”; काँग्रेसची टीका

Winter Session Maharashtra 2023: निवडणूक आयोगावर किती दबाव आहे हे उच्च न्यायालयाने फटकारले त्यातून दिसते. लोकसभा सदस्याचे निधन झाले आणि लोकसभेचा कालावधी एक वर्षाचा असेल तर पोटनिवणूक घेतली पाहिजे तसेच विधानसभा सदस्याचे निधन झाले आणि सहा महिन्यांचा कालावधी असेल तर पोटनिवडणूक घेतली पाहिजे अशी संविधानात तरतूद आहे पण निवडणूक आयोगाने पुणे व चंद्रपूरची पोटनिवडणूक घेतली नाही. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे उघड आहे. निवडणूक आयोगाने आतातरी सुधारावे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ७३ व्या घटनादुस्तीनुसार दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत परंतु दोन-तीन वर्षे झाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेतलेल्या नाहीत, डेंग्युमुळे लोक मरत आहेत, जनतेची कामे होत नाहीत, भ्रष्टाचार बोकाळला आहे, जनतेच्या पैशाची लुट सुरु असून प्रशासक राज सुरु आहे. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, या आयुक्ताच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत. विधानसभेत हा प्रश्न मांडला होता, मुख्यमंत्री यांनी पत्र देण्यास सांगितले आहे, या भ्रष्ट आयुक्ताला तातडीने बडतर्फ करा अशी आमची मागणी आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यात मराठा ओबोसी, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त अशा सर्वच जातीचे शेतकरी आहेत पण सरकारला त्याचे देणेघेणे नाही. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पाण्याची आणीबाणी अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री त्यावर तातडीने उत्तर देतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी उत्तर दिलेले नाही. राज्यात भयावह परिस्थिती आहे, मुख्यमंत्री जनतेल्या वाऱ्यावर सोडणार नाही म्हणतात पण जनतेला या सरकारने वाऱ्यावर सोडलेले आहे. भाजपाप्रणित सरकार राज्यातील ओबीसींवर अन्याय करत आहे, फंड देत नाही, ओबीसी समाजाला नोकऱ्यात डावलले जात आहे, असे सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात जाहिरपणे सांगितले. भुजबळ व फडणवीस एकत्र आहेत अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यात आरक्षणासाठी विविध समाज घटक रस्त्यावर उतरले आहेत. शासकीय कार्यालये ओस पडली आहेत, प्रशासन कोलमडले आहे, जनतेची कामे होत नाहीत, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते?  महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे ही वस्तुस्थिती आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
 

Web Title: congress nana patole criticised central govt and election commission in winter session maharashtra 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.