नागपूर: नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामधील काही नेते नाराजीचा सूर आवळू लागले आहेत. शेतकरी, विदर्भ अशा प्रश्नांवर ठाम भूमिका घेणा-या नेत्यांना एकत्र करीत तिसरी आघाडी उभारण्याचे संकेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिले. यासाठी आपण पुढाकार घेतला तर कुणाला आवडेल, न आवडेल. त्यामुळे कुणी पुढाकार घेतला तर आपण त्यासाठी नक्की मदत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले, १५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा दिला. त्यांना खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. मात्र, भाजपाही तशीच निघाली. त्यामुळे तिस-या आघाडीसारखे एखादी महाआघाडी उदयास आली तर तिच्या सोबत जाण्याचा विचार केला जाईल. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी विविध पक्षांना सोबत घेऊन रिडालोसची मोट बांधली होती. त्यात आपला सिंहाचा वाटा असे सांगत त्यांनी भविष्यातील बांधणीचे संकेतही दिले.
राज्य सरकारने कापूस व धान उत्पादकांना मदत जाहीर केली. ही मदत फसवी आहे. एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे का, हे राज्य सरकारने आधी सांगावे. विमा कंपन्या न्यायालयात जातील. शिवाय अनेकांनी विमाच काढलेला नाही. त्यामुळे ती मदतही मिळणार नाही. बियाणे कंपन्याही तशी भूमिका घेतील. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकºयांना कुठलीच मदत मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बी.टी.चे वाण विकणाºया बियाणे कंपन्यांना संशोधनाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी घेतात. आता बी.टी. बियाण्यांवर बोंड अळी आल्यामुळे या कंपन्यांचे संशोधन फोल ठरले आहे. त्यामुळे आता शेतकºयांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी या कंपन्यांवर निश्चित करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी केली. शेतकºयांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनाऐवजी आता जुलैचे अधिवेशन नागपुरात घेण्याचा प्रस्ताव पुढे केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वेगळ्या विदर्भाचे समर्थन
- जयसिंगपूर येते २०१० मध्ये स्वाभीमानी पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन झाले होते. त्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी छोटी राज्ये सोयीस्कर असतात, असा ठराव घेण्यात आला होता. छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, गोवा यासारख्या छोट्या राज्यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. तेलंगणाच्या आंदोलनालाही आपण पाठिंबा दिला होता, असे सांगत वेगळ्या विदर्भाच्या मागणीला व त्यासाठी होणाºया आंदोलनांना आपला पाठिंबा असल्याचेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.
कर्जमुक्तीसाठी लोकसभेत मांडणार विधेयक
- शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतमालाला उत्पादनखर्चासह ५० टक्के नफ्याची हमी द्यावी, असा कायदा करण्यासाठी आपण लोकसभेत अशासकीय विधेयक मांडणार असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. पुढील दोन महिने देशभर फिरून शेतकरी, कृषी तज्ज्ञ, अर्थ तज्ज्ञांकडून यावर सूचना मागविल्या जातील. या विधेयकाला कोण कोण मदत करते यावरून सर्वच पक्षांची शेतकºयांप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.