काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणते पराभवाच्या भीतीनेच प्रभाग रचना केली रद्द; भाजपचा वेगळा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 12:26 PM2022-08-04T12:26:41+5:302022-08-04T12:29:30+5:30

तीन ऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक

Congress-NCP says that three member ward formation was canceled due to fear of defeat | काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणते पराभवाच्या भीतीनेच प्रभाग रचना केली रद्द; भाजपचा वेगळा सूर

काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणते पराभवाच्या भीतीनेच प्रभाग रचना केली रद्द; भाजपचा वेगळा सूर

Next

नागपूर : महाविकास आघाडीने केलेली तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून पुन्हा जुन्याच चार सदस्यीय पद्धतीने रचना करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे. गेल्या १५ वर्षांत नागपूर महापालिकेत सत्ता असतानाही भाजपने जनहिताची कामे केली नाही. आता पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे प्रभाग रचनेची खेळी करून निवडणुका जिंकण्याचा डाव भाजपने आखला असल्याची टीका केली आहे. तर भाजपने यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येचे निकष डावलून चुकीची प्रभाग रचना केली होती. या सरकाने त्यात दुरुस्ती केली, असा युक्तिवाद भाजपने केला आहे.

प्रभाग बदलले तरी जनता सोडणार नाही 

- चार सदस्यीय प्रभागात नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित होत नव्हती. राज्यकर्त्यांनी जनहित विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेली भाजप सपशेल अपयशी ठरली. पिण्याचे पाणी, कचरा संकलन खासगीकरण झाले. फसव्या योजना दिल्या. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नाही तर पावसाळ्यात घरात पाणी असे चित्र होते. आता पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जनतेने मनात ठाणले आहे. कितीही प्रभाग बदलले तरी जनता भाजपला माफ करणार नाही.

- आ. विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

पराभव दिसत असल्याने निर्णय 

-सर्वोच्च न्यायालयाला न मानणारी सरकार आहे. तातडीने निवडणूक घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानुसार प्रक्रिया झाली. आता जनतेत आपली पकड सैल झाली आहे हे लक्षात आल्यामुळे पक्षाच्या ताकदीवर निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने प्रभाग रचना बदलण्याची खेळी केली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. भाजपने हा निर्णय जनहितासाठी नव्हे तर पक्ष बळकटीसाठी घेतलेला आहे. चार सदस्यीय प्रभागात पुन्हा जनतेचा फूटबॉल होईल.

- दुनेश्वर पेठे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

१२० जागा जिंकूच 

- २०११ पासून जनगणना झाली नसतानाही जागा वाढविल्या. जनगणनेचे ब्लॉक तोडल्याचा सरकारकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत सरकारने निर्णय घेतला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बूथपासून प्रभागापर्यंत सक्रिय कार्यकर्त्यांचा संच आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते सतत शहराच्या विकासासाठी राबत आहेत. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षांत नागपूरसाठी विकास निधी दिला नाही. जनता विकासकामांच्या पाठीशी राहील. यावेळी १२० पेक्षा जास्त जागा जिंकू.

- आ. प्रवीण दटके, शहर अध्यक्ष, भाजप

भाजप म्हणते..

महानगरपालिकेच्या निवडणुका २०१७ प्रमाणे चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याच्या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणूक सोपी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. विशेष म्हणजे ज्यांना उमेदवारीबाबत साशंकता होती त्यांच्या आशादेखील परत पल्लवित झाल्या आहेत.

तीनसदस्यीय पद्धतीची घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होते. शिवाय अनेक प्रभागांच्या रचनेतच बदल झाल्यामुळे भाजपला काही ठिकाणी फटका बसण्याचीदेखील चिन्हे होती. यामुळे भाजपने नव्याने नियोजन करण्यावर भर दिला होता; परंतु आता ही प्रभाग रचना रद्द झाल्यामुळे भाजपसाठी महापालिकेची लढाई बऱ्याच अंशी सोपी झाल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने बूथपातळीवर भाजपचा संपर्क आहे. प्रभाग तसेच कायम राहणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फारशी अडचण जाणार नाही. कॉंग्रेस व शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू असताना आम्ही संपूर्ण लक्ष बूथ मजबुतीवरच दिले होते. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका झाल्या तर निश्चितच आमचा फायदा होईल. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे ओबीसींनादेखील न्याय मिळेल, असे प्रतिपादन आ. कृष्णा खोपडे यांनी केले.

तीनसदस्यीय प्रभाग पद्धती जाचकच

तीन सदस्यीय प्रभागरचनेमध्ये कुठे दोन महिला, तर कुठे दोन पुरुष असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आलेली होती. संबंधित रचनेत मोठ्या प्रमाणात तफावत होती. मात्र चारसदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वांनाच फायदा होईल, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Congress-NCP says that three member ward formation was canceled due to fear of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.