लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर ( Marathi News ): पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करून निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिला.
मनुस्मृती दहन दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे आयोजित भारतीय स्त्री मुक्तिदिन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तीत आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीत आपण एकत्र लढलो तर स्वागतच आहे. जो कोणी उमेदवार असेल तो जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी खूणगाठ मनाशी बांधा. ज्या पक्षाला पाठिंबा दिला असेल, त्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान ५०० मते मिळालीच पाहिजेत. यासाठी वाट्टेल ते करा. एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले. यावेळी स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सुजात आंबेडकर उपस्थित होते.
देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे राजकारण
आरक्षणाच्या नावाखाली राज्यात मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला जात आहे. सध्या देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे आणि ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरू आहे. यातून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे. ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ काही गोष्टी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या चुकल्या तशा नागपूरकरांच्याही चुकल्या आहेत. घाबरता कशाला, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.