काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जि.प़ गटनेत्याची निवड आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:54 AM2020-01-15T00:54:28+5:302020-01-15T00:56:26+5:30
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण होणार आहे़ काँग्रेसने सोमवारी तर राष्ट्रवादीने मंगळवारी गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे येत्या १८ जानेवारीला अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाकडून बुधवारी संबंधित नावाचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकृतरीत्या गटनेत्याचे नाव जिल्हाधिकारी घोषित करतील़ जि.प.मध्ये काँग्रेसचे ३० उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा होत असताना आता उपाध्यक्षपदावरही काँग्रेसने दावा केल्याची माहिती आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीतून सलील देशमुख यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्याचसोबत एका सभापतीचीही राष्ट्रवादीची मागणी आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक झालेली नाही. त्यामुळे कुणाच्या काय पदरात पडणार हे अस्पष्टच आहे. जिल्हा परिषदेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेला भाजपाला यंदा विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. विरोधक म्हणून भाजपाला अनुभवी सदस्याची निवड करावी लागणार आहे. निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारापैकी अनिल निधान व व्यंकट कारेमोरे हे दोन सदस्य ज्येष्ठ आहेत. या दोघांमधून विरोधी पक्ष नेत्यापदी अनिल निधान यांचे नाव चर्चेत आहे.
राष्ट्रवादीच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार
जिल्हा परिषद व पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या सदस्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार विजय घोडमारे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, माजी सभापती सतीश शिंदे आदी उपस्थित होते.