ओबीसी शिष्यवृत्तीसाठी काँग्रेस ओबीसी विभाग आंदोलन करणार; बैठकीत ठराव संमत
By कमलेश वानखेडे | Published: July 10, 2023 04:47 PM2023-07-10T16:47:48+5:302023-07-10T16:48:39+5:30
बेरोजगारीच्या प्रश्नावर संविधान चौकात धरणे देणार
नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वस्तीगृह, रोजगार, परदेशी शिष्यवृत्ती यासह ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध समस्याांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा ठराव नागपूर शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या बैठकीत घेण्यात आला.
काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष राजेश कुंभलकर यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात बैठक झाली. तीत महासचिव डॉ. गजराज हटेवार, माजी नगरसेवक ॲड. अशोक यावले , माजी नगरसेवक रमण पैगवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, संजय भिलकर, चंद्रकांत हिंगे, ॲड. सूर्यकांत जयस्वाल, विजया धोटे आदी उपस्थित होते. ओबीसी विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झाली नसल्याच्या तक्रारी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओबीसी विभागाकडे केल्या आहेत.
या तक्रारीच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळावी याकरिता आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, शासनाच्या अनेक जाहिरातींमध्ये ओबीसी टक्का कमी केल्याने तो वाढवून देण्यात यावा या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता संविधान चौक येथे धरणे देण्याचाही ठराव घेण्यात आला.
बैठकीत केशव धावडे, विलास बारसकर, परमेश्वर राऊत, माहादेवराव गावंडे, कुमार मुरकुटे, प्रकाश लायसे आदींनी मत मांडले. संचालन महासचिव मोरेश्वर भादे यांनी केले.