नागपूर: कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री आहे. २०२४ मध्ये जंग जंग पछाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभव करू शकले नाही. घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळा टू जी स्कॅम नॅशनल हेरॉल्ड, यासारखे अनेक घोटाळे झाले आहे. घोटाळ्यांची मालिका इतकी मोठी होती की २०१४ व २०१९ मध्ये जनतेने काँग्रेसला घरी बसवले. लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिले की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाली. आम्हाला १९ टक्के मते, तर ठाकरे यांना १४ टक्के मते मिळाली आहेत. लोकांनी आता यावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले.
आम्ही १३ जागांवर लढलो, सात जिंकलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतले. उद्धव ठाकरेचा सेनेचा ४२ टक्के स्ट्राईक रेट होता. तर आमच्या ४७ टक्के स्ट्राइक रेट आहे. आता रडणं बंद करा. शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे. याची प्रचिती विधानसभेत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकी केली, अभद्र युती केली याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे. ती कायमस्वरूपी राहील. हे शेती पंप सोलरवर आम्ही कन्वर्ट करू. जे वीज बिल माफ केल आहे, ते पर्मनंट राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना कायम स्वरुपी राहील- महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार रुपये देत आहोत. तीन सिलेंडर मोफत देत आहोत. भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. ती दिलेली सन्मानाची भेट आहे. आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती सर्व नऊ जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला.