प्रदेशाध्यक्षांचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचा वाढला तोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 02:50 PM2021-11-29T14:50:59+5:302021-11-30T10:29:33+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही तोरा वाढला आहे. राष्ट्रवादीचा फारशी ताकद नाही. स्वत:ची अशी व्होट बँक नाही, अशी कारणे देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याच्या विचारात काँग्रेस नेते आहेत.
नागपूर : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत मतांसाठी राष्ट्रवादीला गळ घालणारी काँग्रेस आगामी महापालिका तसेच नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला दूर सारण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही तोरा वाढला आहे. राष्ट्रवादीचा फारशी ताकद नाही. स्वत:ची अशी व्होट बँक नाही, अशी कारणे देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याच्या विचारात काँग्रेस नेते आहेत.
काँग्रेसचे चार आमदार
नागपूर शहर व जिल्ह्यात एकूण १२ पैकी ४ आमदार काँग्रेसचे आहेत. नागपूर शहरात पालकमंत्री नितीन राऊत, आ. विकास ठाकरे तर ग्रामीणमध्ये क्रीडा मंत्री सुनील केदार व आ. राजू पारवे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. या निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला चांगली साथ मिळाली होती. त्याचा काँग्रेसला फायदा झाला होता. आता मात्र, शहर व ग्रामीणच्या चारही आमदारांना याचा सोयिस्कर विसर पडला आहे.
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचीच सत्ता
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. ५८ पैकी ३३ सदस्य काँग्रेसचे आहेत. नुकतीच १६ जागांसाठी पोटनिवडणूक आटोपली. त्यात मात्र, काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी केली होती. काँग्रेसने १६ पैकी १० जागा लढवत ९ जागा जिकल्या. राष्ट्रवादीशी आघाडीचा फारसा फायदा झाला नाही. उलट राष्ट्रवादीला काँग्रेसचा आधार मिळाला, असे मत निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते.
पंचायत समित्यांवरही काँग्रेसचा बोलबाला
जिल्ह्यात १३ पंचायत समिती आहे. त्यापैकी १० काँग्रेसच्या ताब्यात आहेत. गेल्यावेळी या सर्व पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होती.
लोकसभेसाठी तयारी जोरात
नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभेच्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढतात. नागपुरात भाजपा विरोधात तर रामटेकमध्ये शिवसेने विरोधात काँग्रेस लढली. दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी सोबत असूनही फारसा फायदा झाला नाही. आता पुन्हा एकदा काँग्रेसने लोकसभेसाठी जोरात तयारी सुरू केली आहे.
नगर परिषद व नगर पंचायतही स्वबळावर
२०२१-२२ मध्ये जिल्ह्यात नगर परिषद उमरेड, कामठी, रामटेक, सावनेर, खापा, मोहपा, कळमेश्वर, मोवाड, नरखेड, काटोल, वाडी तर नगर पंचायत हिंगणा, कुही व भिवापूर येथे निवडणूक होऊ घातली आहे. या सर्व निवडणुका स्वबळावरच लढण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस आहे. काही मोजक्या ठिकाणी राष्ट्रवादी तुल्यबळ आहे. तेथे प्रसंगी वेगळा विचार केला जाऊ शकतो.
महापालिकेत राष्ट्रवादीला सोबत घेऊन फायदा काय ?
फेब्रुवारी २०२२ मध्ये नागपूर महापालिकेची निवडणूक आहे. सद्यस्थितीत १०८ नगरसेवकांसह भाजपची एकहाती सत्ता आहे. काँग्रेसचे २९ तर राष्ट्रवादीचा १ नगरसेवक आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घोषणेला पाठबळ देत शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. विजयाची शक्यता असलेल्या जागा राष्ट्रवादीला देणे म्हणजे काँग्रेसचे नुकसान करून घेणे आहे. तसेही तीन सदस्यीय प्रभागात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव दिसणार नाही. काँग्रेसकडे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करून जागा सोडण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन न्याय दिलेला बरा, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.
स्वबळामुळे कार्यकर्त्यांना संधी
नागपूर शहरात काँग्रेसचे संघटन वाढले आहे. गेल्या तीन निवडणुकांत काँग्रेसची मते वाढली आहे. प्रत्येक प्रभागात एका जागेसाठी किमान चार ते पाच सक्षम दावेदार आहेत. अशात राष्ट्रवादीशी आघाडी केली तर ते किमान ५० जागा मागतील. एवढ्या जागा सोडल्या तर त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेससाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. स्वबळावर लढलो तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तिकीट देऊन न्याय देता येईल.
- आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस