नागपूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर होणार आहेत. त्यांना नोटीस बजावल्याने काँग्रेस नेते आक्रमक झाले असून ईडी विरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. नागपुरातील ईडी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकार व ईडी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून आज (दि. २१) नागपुरातील ई़डी कार्यालयासमोर काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार, विकास ठाकरे अभिजीत वंजारी, राजेंद्र मोडक यांच्यासह महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष कुंदा राऊत व शहर अध्यक्ष नॅश अली यांच्यासह मोठे प्रमाणात कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. सोनिया गांधी यांच्यावरील कारवाई थांबत नाही तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता मागे हटणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है, मोदी सरकार मुर्दाबादचे नारे लावण्यात आले.
कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ईडी कार्यालयासमोर कठडे लावून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरले. दरम्यान, आमदार विकास ठाकरे व अभिजीत वंजारी यांच्याकडून पोलिसांच्या कठड्याला धक्के मारून तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलिसांनी माजी मंत्री सुनील केदार आमदार विकास ठाकरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमकन अग्निहोत्री, प्रशांत धवड, नरेंद्र जिचकार व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अमरावतीतही कार्यकर्ते रस्त्यावर
अमरावती काँग्रेस कमेटी शहर व ग्रामीण यांच्या वतीने स्थानिक इर्विन चौक येथे केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीसह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.