नागपूर : भाजपने शुक्रवारी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली. तर, काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या एका नगरसेवकाने शनिवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत भाजपच्या पहिल्या फळीतील एक नेता व आणखी एक नगरसेवकही होते, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडा मंत्री सुनील केदार हे देखील उपस्थित होते.
भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. संख्याबळानुसार भाजपचे पारडे जड आहे. मात्र, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. त्यामुळे निकालापर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव चर्चेत आहे. भाजपचे संख्याबळ ४४ ने जास्त असताना मुळक यांनी इलेक्शन मॅनेजमेंट साधत भाजपला ४ मतांनी मात दिली होती. नितीन राऊत, सुनील केदार, विकास ठाकरे व मुळक यांच्याकडे काँग्रेसची मते आहेत. त्यामुळे या चारपैकी एकाही नेत्याला डावलून उमेदवार ठरविण्यात आला तर निकालावर परिणाम होऊ शकतो.
भाजपमधून उमेदवार आयात करून त्याला लढविले तर त्याच्यासोबत मोठा गट येऊ शकतो का, त्याची तेवढी क्षमता आहे का, यावरही मंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री प्रदेशाध्यक्ष पटोलेंना भेटलेल्या भाजप नेत्यांनी त्यांच्यासोबत एक मोठा गट असून तो पडद्यामागून मदत करू शकतो, अशी हमी दिली. मात्र, ही निवडणूक केवळ विश्वासावर होत नाही, तर मतदार आपल्या तंबूत बसवून मोजून दाखवावे लागतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी अद्याप भाजपच्या या फुटीर गोटाला होकार कळविलेला नाही, अशी खात्रीलायक माहिती आहे.
विलंबामुळे काँग्रेसजण नाराज
काँग्रेसजवळ विजयासाठी लागणारे संख्याबळ नाही. भाजप ७० ते ८० मतांनी आघाडीवर आहे. असे असतानाही काँग्रेस नेत्यांनी आपसात बसून उमेदवार निश्चित केलेला नाही. उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे मतदार असलेले काँग्रेसजण नाराज आहेत. नेत्यांना ही निवडणूक खरच लढायची आहे की पुन्हा एकदा ‘सेटलमेंट’ करायची आहे, असा प्रश्न काहींनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
बावनकुळे सोमवारी अर्ज भरणार
भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी सकाळी १०.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप नेते असतील. उमेदवारी जाहीर होताच बावनकुळे यांची यंत्रणा सक्रिय झाली असून, मतदारांशी संपर्क साधण्यास सुरू झाले आहे.