नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरविले आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी बर्वे यांच्या वकिलांनी केली आहे. असे असले तरी काँग्रेसकडे अशा परिस्थितीत प्लॅन बी तयार असून रश्मी यांचे पती शामकुमार या जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बर्वे यांनी खोट्या व अवैध कागदपत्रांचा वापर केल्याची तक्रार करत आक्षेप घेतला होता. याप्रकरणी राज्य सरकारकडेही तक्रार करीत चौकशीची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने जिल्हा जात पडताळणी समितीला या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस बजावत कागदपत्र सादर करण्याची सूचना दिली होती. मात्र बर्वे यांनी कागदपत्र सादर न करता हा आपल्या विरोधात राजकीय डाव असल्याचे कारण देत मुदत वाढून मागितली होती. गुरुवारी सकाळी जिल्हा जात पडताळणी समितीने बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविले. या निर्णयाविरोधात बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु या गोंधळात काँग्रेसकडे वेगळा उमेदवार तयार असल्याने, काँग्रेससाठीही दिलासादायक बाब आहे.
- पती शामकुमार होऊ शकतात उमेदवारजात पडताळणी प्रमाणपत्रावरून आपल्या अडचणी वाढू शकतात असे लक्षात येतात काँग्रेसने आपली रणनिती बदलली होती. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले आहे. श्यामकुमार यांनी काँग्रेसकडून स्वतंत्र अर्जही भरला आहे. त्यामुळे रश्मी यांचा अर्ज रद्द झाल्यास श्याम कुमार हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होतील.
- छाननिकडे लक्ष, उमेदवारी रद्द होणारक्रांती लोकसभा मतदार संघासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्ज यांची गुरुवारी छाननी होणार आहे. बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याबाबत ची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाकडून तातडीने दिलासा मिळाला नाही तर छाननीत बर्वे यांचा अर्ज रद्द होऊ शकतो.