नागपूर : फक्त काँग्रेसमुळे देशात गरिबी असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काही फायदा नाही असेही ते म्हणाले.
आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्यावरून राज्यभरात टीका करण्यात आली. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, पंतप्रधान मोदी जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यांनी त्या वेळच्या परिस्थितीला धरून आपली प्रतिक्रिया दिली होती, असे म्हणत आठवलेंनी मोंदीना पाठिंबा दर्शविला.
शिवसेना वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे. अडीच-अडीच वर्षांचा जो फार्मूला ठरला होता त्यानुसार अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पाचही राज्यात भाजप एनडीएचे सरकार येणार
पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांसाठी मोदी यांनी मोठे मन करून कायदे मागे घेतले. यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांचा भाजपला आता पाठिंबा असून भाजपला नाकारता येत नाही. तर, उत्तर प्रदेशमध्येही भाजपने चांगल काम केलं आहे. उत्तर प्रदेशात फक्त मायावती एकट्याच नाहीत, आरपीआयला लोकांचा पाठिंबा आहे. भाजपला आमचा पाठिंबा असून उत्तर प्रदेशात भाजपला जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले.