ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 06 - शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेस राजकारण करीत असून केवळ टीका करण्याचे धोरण स्वीकारले आहे. राज्य शासनावर आरोप करणा-या काँग्रेसने त्यांची सत्ता असलेल्या कर्नाटक व पंजाब या राज्यात कर्जमाफी द्यावी, असे आव्हानच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांना दिले आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली.
कर्जमाफीसंदर्भात राज्य शासनाने दिलेली आकडेवारी फसवी असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेस केवळ या मुद्यावर राजकारण करीत आहे. खरोखरच शेतक-यांबाबत सहानभूती असेल तर महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटक आणि पंजाबमध्ये कर्जमाफी करून दाखवावी, असे ते म्हणाले. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसोबतच आता राज्य सरकार कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्याचे नियोजन करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
‘डिजिटल प्लॅटफॉर्म‘च्या साहाय्याने कर्जमाफी
राज्यातील शेतकरी कर्जमाफी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर होणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली ‘ डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या माध्यमाने कर्जमाफी होणार असल्याने यात कुणीही घोटाळा करू शकणार नाही असेही त्यांनी सांगितले. तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिल्यानंतर २००९ मध्ये या संबंधी आॅडिट विभागाने हरकत घेतली होती. कर्जमाफीचा दुरुपयोग झाल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता. गरजू शेतक-यांपर्यंत सर्वसामान्य जनतेचा पैसा पोचला पाहिजे म्हणून ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या माध्यमाने आता कर्जमाफी होईल. आंध्र प्रदेशने याचप्रकारे कर्जमाफी दिली होती, असे त्यांनी सांगितले.
गंगाखेडप्रकरणी चौकशी सुरू
हजारो शेतक-यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि बँकेच्या अधिका-यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विचारणा केली असता, यासंबंधी संबंधित विभाग चौकशी करीत असून, तक्रारीचे तथ्य तपासून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.