हिंमत असेल तर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे : अनुराग ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 09:34 PM2020-01-03T21:34:25+5:302020-01-03T21:38:31+5:30
सोनिया आणि राहुल गांधींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन कॉंग्रेससह विरोधी पक्ष देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात हा कायदा कुणाचे नागरिकत्व हिरावणारा नसून नागरिकत्व देणारा आहे. संसदेने याला मान्यता दिली असून संवैधानिकरित्या तो मजबूत आहे. कॉंग्रेस या कायद्यासह ‘एनआरसी’ व ‘एनपीआर’ यांची सरमिसळ करुन उगाच संभ्रम निर्माण करत आहे. सोनिया आणि राहुल गांधींनी या कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून अन्यायाला कंटाळून भारतात आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्त्व मिळणार आहे. या शरणार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुसूचित जातीच्या लोकांचादेखील समावेश आहे. असे असताना सोनिया, काँग्रेस या कायद्याला जाणुनबुजून विरोध करत आहे का, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला.
सोनियांना भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यावर कुणीच त्याला विरोध दर्शवला नव्हता. मग काँग्रेस इतरांच्या नागरिकत्त्वाला विरोध का दर्शवत आहे. भारताचे सर्व नागरिक समान असून हा देश आणि केंद्र सरकार संविधानावर चालते. आमचे सरकार किंवा कुठलाही कायदा मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही. मुस्लीम समाजानेदेखील हा कायदा समजून घ्यावा, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले. नागपूर पत्रकार क्लब येथे झालेल्या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.विकास कुंभारे, महापौर संदीप जोशी, डॉ.राजीव पोतदार, अर्चना डेहनकर, संदीप जाधव, चंदन गोस्वामी, शिवानी दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले
शरणार्थ्यांना नागरिकत्व मिळावे ही महात्मा गांधी यांची इच्छा होती. आमच्या सरकारने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. परंतु व्होटबँकेच्या राजकारणासाठी कॉंग्रेस आकांडतांडव करत आहे. कॉंग्रेसचे लोक संसदेत तर येत नाही, परंतु बाहेर चुकीचे वक्तव्य करुन लोकांमध्ये भिती निर्माण करत आहेत.
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
यावेळी अनुराग ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. ‘जीएसटी’च्या परताव्यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांचे मंत्रीदेखील उपस्थित होते. त्यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यावी व मग टीका करावी. परंतु त्यांच्याकडे नवीन जबाबदारी आहे व कधी नाही ते पद आले आहे. त्यामुळे ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या शब्दांत ठाकूर यांनी ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या ठाकरेंसह, ममता बॅनर्जी, कॉंग्रेस यांचे कुटुंब पाकिस्तानात असते व त्यांच्या कुटुंबातील महिलांवर अत्याचार झाले असते तर त्यांनी काय केले असते याचा विचार करावा, असेदेखील ते म्हणाले. अफगाणिस्तान, पाकमधील हिंदू लोकांवर अन्याय होत असताना शिवसेना मूकदर्शक का बनली आहे, असा सवालदेखील त्यांनी केला.