‘विदर्भ कनेक्ट’ची मागणी: इतिहासात केला होता ठराव मान्यनागपूर : वेगळ्या विदर्भासाठी कॉंग्रेसने विरोधात भूमिका घेतली असली तरी इतिहासात पक्षाने याबाबतचे ठराव मान्य केले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने याची आठवण ठेवत वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीला समर्थन देत याच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी संघटनेकडून करण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी ११ एप्रिल रोजी नागपुरात येत असून या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.१९२७ साली चेन्नई ( अगोदरचे मद्रास) येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनादरम्यान कॉंग्रेसने विदर्भाच्या निर्मितीचा ठराव मान्य केला होता. १ आॅक्टोबर १९३८ मध्ये कॉंग्रेसने सीपी अॅन्ड बेरार विधिमंडळातदेखील विदर्भाच्या निर्मितीला पाठिंबा दिला होता तर १९४८ साली कॉंग्रेसच्या सरकारने नेमलेल्या दार आयोगाने विदर्भाच्या निर्मितीची शिफारस केली होती. या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांचा समावेश होता व त्यांनीदेखील याला मान्यता दिली होती. विदर्भाच्या आंदोलनाला दिल्लीत पोहोचविणारे जांबुवंतराव धोटे यांनादेखील इंदिरा गांधी यांनी विदर्भ निर्मितीचे आश्वासन दिले होते. कॉंग्रेसच्या इतिहासातील मोठ्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीला समर्थन दिले होते तर आत्तादेखील नागपुरातील अनेक कॉंग्रेसचे नेते विदर्भाच्या निर्मितीला पाठिंबा देत आहेत. अशा स्थितीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान वेगळ्या विदर्भाला समर्थन द्यावे, अशी मागणी ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
वेगळ्या विदर्भासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा
By admin | Published: April 10, 2016 3:20 AM