जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है; नागपुरात काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 11:22 AM2022-06-13T11:22:22+5:302022-06-13T13:27:26+5:30
काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले.
नागपूर : केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांविरोधात प्रदेश काँग्रेसच्यावतीने आज (दि. १३), राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली आहे. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले.
केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी विरोधी धोरणासह काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व नेते खा. राहुल गांधी यांना हेतूपुरस्सरपणे सक्तवसुली संचालनालयाची नोटीस (ईडी) बजावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत तर नागपुरात ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून काँग्रेसचे इतर नेते दाखल झाले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुनील देशमुख, माजी आमदार वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अविनाश राजूरकर आदी आंदोलनस्थळी पोहोचले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.
दरम्यान, 'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना ८ जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले असून याविरोधात काँग्रस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.