सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल
By कमलेश वानखेडे | Published: September 15, 2022 04:43 PM2022-09-15T16:43:32+5:302022-09-15T16:49:14+5:30
''महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल''
नागपूर : वेदांता - फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातच १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. १५ जुलैला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या कंपनीला सर्व सुविधा व सवलती देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी सुरत व गुवाहाटीमध्ये जो काही खेळ चालला, त्याचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का, असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
लोंढे म्हणाले, संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वी होईल, याबाबतचा फिजिबिलीटी रिपोर्ट आहे. सेमी कंडक्टर उत्पादनासाठी महाराष्ट्राचे वातावरणही पोषक आहे. येथील एक लाख युवकांना रोजगार मिळणार होता. गुजरातमध्ये सुविधा नाहीत. स्कील रोजगार नाहीत. असे असतानाही हा प्रकल्प गुजरातला का जाऊ दिला, असा सवाल करत महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर काँग्रेस शांत बसणार नाही. रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करेल, असा इशारा लोंढे यांनी दिला.
अग्रवाल यांच्यावरही दबाव ?
वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्वीट करत गुजरातमध्ये प्रकल्प नेण्याचे कंपनीने आधीच ठरविल्याचे म्हटले आहे. मात्र, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राने जास्त सवलती दिल्या होत्या. अग्रवाल यांनी असे ट्वीट करण्यामागे त्यांच्यावर काही दबाव आहे का? अशी शंका लोंढे यांनी उपस्थित केली. आता वेदांता महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार, असे सांगितले जात असून, हा देखील एक जुमला असल्याची टीका लोंढे यांनी केली.