काँग्रेसचा मनपावर हल्लाबोल, मडके फोडून निषेध; आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 11:25 AM2022-05-28T11:25:20+5:302022-05-28T11:27:56+5:30

आयुक्त कॅबिनमध्ये खूश आहेत, तर त्यांच्या खालील अधिकारी वसुलीत मशगूल आहेत, अशी तक्रार करीत काँग्रेसने शुक्रवारी महापालिकेवर हल्लाबोल केला.

Congress staged agitation on nagpur municipal corporation | काँग्रेसचा मनपावर हल्लाबोल, मडके फोडून निषेध; आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

काँग्रेसचा मनपावर हल्लाबोल, मडके फोडून निषेध; आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देआयुक्त कॅबिनमध्ये खूश, अधिकारी वसुलीत मशगूल

नागपूर : महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. मात्र, जनतेच्या कुठल्याही समस्यांची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. आयुक्त भ्रष्टाचारी नाही, पण खाली भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक नाही. आयुक्त कॅबिनमध्ये खूश आहेत, तर त्यांच्या खालील अधिकारी वसुलीत मशगूल आहेत, अशी तक्रार करीत काँग्रेसने शुक्रवारी महापालिकेवर हल्लाबोल केला.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, गिरीश पांडव आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेवर धडक दिली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे प्रशासकीय इमारतीतच मडके फोडून निषेध नोंदविण्यात आला. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. मात्र ओसीडब्ल्यू भरमसाट बिल वसूल करीत आहे. कचरा उचलणारी कंपनी मातीचे ढीग भरून पैसा उकळत आहे. मात्र, कारवाई केली जात नाही. सामान्यांचे अतिक्रमण तोडले जाते. तर मोठ्यांचे वाचविले जाते. अतिक्रमण विभाग सुपारी घेऊन घर रिकामे करण्याचे काम करीत आहेत. एनडीएस पथक चालानच्या नावावर हप्ता वसुली करीत आहेत. नागरिकांना त्रास दिला जात आहे. रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात बिअर बार व कॅफेला मंजुरी दिली जात आहे. नागरिकांना याचा त्रास होत आहे. मात्र, तक्रार करूनही मनपाचे अधिकारी कारवाई करीत नाही. खड्डे, पाणी, बंद पथदिवे, कर वसुली आदींबाबत सामान्य नागरिकांनी कुठलीही तक्रार केली तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. स्टेशनरी घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल यावेळी आ. विकास ठाकरे यांनी केला.

आयुक्तांना परत बोलवा

नागपूर शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात आयुक्त राधाकृष्णन बी. हे कमी पडले आहेत. त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. जनतेचे प्रश्न सुटेनासे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सरकारने परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री व राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेसने घेतलेले आक्षेप

- कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांवर दरवर्षी ५ टक्के वाढीव मालमत्ता कर लादला जातोय. शहरवासीयांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्याकडून जिझिया कराप्रमाणे ही वसुली सुरू आहे. कर संकलनाचे काम दिलेली ‘सायबर टेक’ ही खासगी एजन्सी कोणत्या माजी आमदाराची आहे? या एजन्सीच्या कामात त्रुटी आढळूनही कारवाई का केली नाही?

- बीओटी तत्त्वावर खासगी कंत्राटदारांनाही उद्याने चालविण्यास देण्यात आली मात्र कंत्राटदार आपली जवाबदारी पार पाडत नसतानाही कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई आयुक्तांनी प्रशासक म्हणून का केली नाही?

- ‘आपली बस’ने महिनाभरात तीनदा पेट घेतला. योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या बसेस नागरिकांच्या जीवावर उदार होऊन रस्त्यांवर फिरत आहेत. यावर आयुक्तांचे कोणतीही प्रशासकीय नियंत्रण नाही.

Web Title: Congress staged agitation on nagpur municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.