नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात दाखल केला आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे. गडकरी यांना ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करून घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत हा अर्ज दाखल केला आहे.
------------
पटोले यांना उत्तरासाठी वेळ
या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पटोले यांनी या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर तर, पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके यांनी बाजू मांडली.